Divya Shinde Arrested: ‘बिग बॉस’ मराठी फेम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डान्सर दिव्या शिंदेला डॉक्टरला मारहाण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातील काळेपडळ पोलिस ठाण्यात दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या नावाखाली दिव्या शिंदे आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी ज्येष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसूण त्यांना मारहाण करुन ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे काळेपडळ पोलिसांनी खंडणी आणि मारहाणीशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी कारवाई करत दिव्या शिंदेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर व्यक्तींची भूमिका याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, दिव्या शिंदे सोशल मीडियावरील रिल्स आणि डान्समुळे चर्चेत आली होती. तिच्या सोशल मीडिया कंटेंटमुळे तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे तिच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातही याची चर्चा सुरू झाली आहे.