Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ची सुरुवात होताच घरातील स्पर्धकांमध्ये वाद, मतभेद आणि नवनवीन समीकरणांना सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरात काही स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, तर काहींच्या वागण्यामुळे घरातील वातावरण तापले. आता या सीझनचा पहिला ‘वीकेंड का वार’ रंगणार असून, सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेणार असल्याची चर्चा आहे.
पहिल्या ‘वीकेंड का वार’चा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये सलमान खान नेहमीच्या फॉर्मल लूकऐवजी जीन्स आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तसेच त्याने डोक्यावर हॅट घातली असून, गाणे गात त्याची एंट्री होताना पाहायला मिळते. त्यामुळे यंदाचा पहिला ‘वीकेंड का वार’ काहीसा वेगळा आणि मनोरंजक असणार असल्याचे दिसत आहे.
पहिल्याच आठवड्यात आसिफ खान आणि काझी तौकीर यांच्यात जोरदार वाद झाला. दोघांमधील हा वाद इतका वाढला होता की परिस्थिती जवळपास हाणामारीपर्यंत पोहोचली होती. यावेळी आसिफने काझीला अपशब्दही वापरले होते. मात्र, त्यानंतर त्याने काझीची माफी मागितली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सलमान खान काय भूमिका घेतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. काझी या आठवड्यात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. कॅमेऱ्यासमोर स्वतःच्या फोटोंशी संवाद साधण्यापासून ते मेडिकल रूममध्ये डॉक्टरांना आपण ‘अभिनय’ करत असल्याचे सांगण्यापर्यंत त्याच्या अनेक गोष्टींची चर्चा झाली. सलमानने घरातील सदस्यांना ही क्लिप दाखवल्यास पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘बिग बॉस २०’च्या पहिल्या आठवड्यात मेरी कोम यांच्याबद्दल करण्यात आलेल्या बॉडी-शेमिंगमुळेही वाद निर्माण झाला. याशिवाय माही विज यांच्या घटस्फोट झालेल्या महिलांविषयीच्या वक्तव्याचीही चर्चा झाली. त्यामुळे सलमान या सर्व मुद्द्यांवर स्पर्धकांना काय सुनावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोणताही स्पर्धक घराबाहेर जाणार नाही
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या २० वर्षांच्या प्रवासातील जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. ‘बिग बॉस १३’मधील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची क्लिप पाहून घरातील सदस्य भावूक झाले. महत्त्वाचे म्हणजे, पहिल्या आठवड्यात कोणत्याही स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार नसल्याने यावेळी सगळे स्पर्धक सेफ आहेत. त्यामुळे आगामी आठवड्यांमध्ये स्पर्धकांचे नवे गट, मैत्री आणि संघर्ष कसे बदलतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.