
Banjara Marathi Movie: परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम. स्नेह पोंक्षे दिग्दर्शित 'बंजारा' या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे 'बंजारा' हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीम मध्ये झाले आहे.
यापूर्वी 'बंजारा' चित्रपटाचे पोस्टर, टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून अनेकांना खूप छान वाटले असेल. हे पडद्यावर जितके सहज, सुंदर दिसत असले तरी या ठिकाणी चित्रीकरण करणे, हे प्रचंड आव्हानात्मक होते. याबाबतचा अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी शेअर केला आहे.
दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, '' हे एक असे चित्रीकरण स्थळ आहे, जिथे आजवर कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही. ही जागाच अशी आहे, की कोणालाही प्रेमात पाडेल. आम्ही सुमारे १४, ८०० फूट उंचीवर चित्रीकरण केले आहे, जिथे खूप कमी ऑक्सिजन होता. आम्ही अक्षरशः ऑक्सिजन स्प्रे व कपूर वापरत होतो. एकतर हवामानाचा काहीच अंदाज नाही. क्षणात उजाडलेले असायचे तर क्षणात पाऊस यायचा. आमचे नऊ दिवसांचे शेड्यूल होते आणि या काळात बराच पाऊस पडला. शेड्यूल बदलू शकत नसल्याने कसंबसं शूटिंग पूर्ण केले. सुमारे दीडशेची टीम घेऊन आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथली जवळपास शंभरच्यावर लोकं होती. अशा सगळ्यांना सेटवर घेऊन आम्ही त्या अनपेक्षित हवामानात चित्रीकरण पूर्ण केले. या सगळ्यासाठी आम्हाला इंडियन आर्मीचे खूप सहकार्य लाभले.''
मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन स्नेह पोंक्षे यानेच केले असून या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.