Avdhoot Gupte Supports Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील वाढते ध्वनीप्रदूषण, डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात रोखठोक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. स्पष्ट आणि अस्खलित मराठीत आपली भूमिका मांडत त्यांनी ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या भूमिकेला काही जणांकडून विरोध होत असला, तरी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, आता मनोरंजन विश्वातूनही त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया समोर येत आहेत.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील टिळक रोड परिसरात विद्यानंद बापट यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांच्या भूमिकेची राज्यभर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरही अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत.
लोकप्रिय गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ खास गाणं तयार केलं आहे. अवधूत आपल्या वेगळ्या संगीत शैलीसाठी ओळखले जातात. आता त्यांनी बापट यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा...” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातून अवधूत यांनी बापट यांच्या स्पष्टवक्तेपणाला आणि त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसून येते.
गाण्याच्या बोलांमध्ये ते म्हणतात,
“स्वच्छ विचार अन्
स्वच्छ वाणीवर
हसणाऱ्या माकडांचा
मंगल असला
पवित्र असला
तरीही देश हा दगडांचा
तुझ्यासारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा
विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा...”
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अवधूत यांनी #SupportBapat, #VidyanandBapatSupport आणि #HatsOffBapat असे हॅशटॅग वापरले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
अभिनेत्री आणि कॉमेडियन आरती सोलंकी यांनीही यापूर्वी विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. त्यांनी बापट यांना डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात बोलताना गणेशोत्सव किंवा गणपती बाप्पाविरोधात गैरसमज होऊ नये, याकडे लक्ष वेधले. तसेच बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही आरती यांनी निषेध केला होता. त्यांच्या पोस्टमधून त्यांनी विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.