Manoj Muntashir And Adipurush Controversy: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून संथगतीने बॉक्स ऑफिसवर कमाई सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर चौथ्या दिवसापासून चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे पडलाय. चित्रपटात वापरलेलं व्हिएफएक्स, रावणाचा लूक, चित्रपटातील संवाद या गोष्टींवरून चित्रपटाच्या निर्माते आणि लेखक यांना ट्रोल केले जात आहे. या चित्रपटातील संवादावरुन मोठा वाद निर्माण झाला असून यावरुन आंदोलन देखील केली जात आहे. यासंदर्भात या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर शुक्ला हे वारंवार प्रतिक्रिया देत आहेत. आता याच प्रकरणावरुन थेट मनोज मुंतशिर यांना अलाहाबाद हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे.
आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्यात यावी यासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान लखनऊ खंडपीठाने या चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांना नोटीस पाठवली आहे. या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डालाच फटकारले आहे. सेन्सॉर बोर्डाने 'या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलंच कसं?', असा सवाल हायकोर्टाने सुनावणीदरम्यान केला आहे. “हिंदू सहिष्णू आहेत, पण प्रत्येक वेळी त्यांच्या संयमाची परीक्षा का घेतली जाते ?” असं देखील कोर्टाने यावेळी विचारले आहे.
या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या प्रकरणी नोटीस बजावली असून त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 'चित्रपटातील संवाद हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मोठा मार्ग आहे. रामायण हे आमच्यासाठी प्रतिरूप आहे. लोकं घर सोडण्यापूर्वी रामचरित्रमानस वाचतात.' असे कोर्टाने यावेळी सांगितले.
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या ‘डिस्क्लेमर’वर 'हे रामायण नाही' असं स्पष्ट लिहलं होतं, हा युक्तिवाद स्वीकारण्यास खंडपीठाने नकार दिला. “निर्मात्यांनी प्रभू श्रीराम, सीतामाँ, भगवान लक्ष्मण, भगवान हनुमान, रावण, लंका हे सर्व चित्रपटात दाखवलं असताना हा भाग रामायणातील नाही हे डिस्क्लेमरद्वारे कसं पटवून देणार.” असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
वादग्रस्त दृश्ये आणि ओळींबद्दल बोलताना कोर्टाने सांगितले की, “सेन्सॉर बोर्ड असे काय करत आहे? तुम्हाला भावी पिढ्यांना काय शिकवायचे आहे?”, असे म्हणत कोर्टाने सेन्सॉर बोर्डालाच सुनावले आहे. दरम्यान, रामायण महाकाव्यावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’ मध्ये साऊथ सुपरस्टार प्रभास रामाच्या भूमिकेत दिसत आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतामाँच्या, सनी सिंह लक्ष्मणाच्या, देवदत्त नागे हा हनुमानाच्या आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनानंतर फारच टीकेचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.