
झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायची संधी देत असते. 'लक्ष्मी निवास' या आगामी मालिकेनिमित्ताने नाविन्यपूर्ण अनुभव घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या मालिकेत तुम्हाला उत्तम कलाकार दिसणार आहेतच, पण एक चेहरा जो मराठी टेलिव्हीजनवर खूप वर्षांनी पुनरागमन करत आहे तो म्हणजे उत्कृष्ट अभिनेता तुषार दळवी जे 'लक्ष्मी निवास' मालिकेत श्रीनिवास ची भूमिका साकारत आहे.
तुषार दळवींनी आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. " या मालिकेतील भूमिकेसाठी जेव्हा झी मराठी कडून मला फायनल कॉल आला तेव्हा खूपच आनंद झाला. झी मराठी वाहिनी बरोबर एक जुनं नात आहे आणि बऱ्याच वर्षांनी मालिका करायला मिळत आहे. ते ही झी मराठीच्या रौप्य महोत्सवावर्षी. त्यात भर म्हणजे मी हर्षदा सोबत काम करत आहे आणि ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. इतके वर्ष एकमेकांना ओळखत असलो तरीही याआधी कधी तो योग्य जुळून आला नाही. पण लक्ष्मी निवास ने ते शक्य केले.
जेव्हा आम्ही पहिला प्रोमो शूट केला, तेव्हा खूप मजा आली कारण मी त्यात स्कुटर चालवत आहे. मी जवळपास २०-२५ वर्षांनी स्कुटर चालवत असेन. माझ्याकडे फारपूर्वी अशीच एक स्कुटर होती जी आम्ही प्रोमो मध्ये दाखवली आहे. त्या स्कुटरवर बसल्यावर माझा सर्व भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून सरकला. त्यानंतर थोडं टेंशन ही आलं कारण स्कुटर बॅलन्स करायची आणि त्यासोबत मी एकटा नव्हतो हर्षदा ही होती तेव्हा तिची ही काळजी होती.
आम्ही तो प्रोमो लाईव्ह लोकेशनवर शूट केलाय आणि पूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. जेव्हा मेकअप करून तयार झालो विग, चश्मा हे घालतल्यावर मी थक्क झालो स्वतः ला ओळखू शकलो नाही. 'लक्ष्मी निवास' या मालिकेतील लूकमुळे वेगळा तुषार दळवी प्रेक्षकांसमोर येईल. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना आवडेल. असा विश्वास तुषार दळवी यांनी व्यक्त केला.
झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' ही मालिका एकत्रित कुटुंबावर आधारित असून येत्या २३ डिसेंबरपासून प्रसारित होणार आहे. तर, या मालिकेत अभिनेते तुषार दळवीसह अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अक्षया नाईक, दिव्या पुगावकर सारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.