मुंबई : सध्या लगोलग बॉलिवूडमधील अनेक चित्रपट फ्लॉप होत आहेत. त्यामुळे बॉलिवूडसाठी हा काळ खूपच बिकट म्हणावा लागेल. मुख्य बाब म्हणजे बॉयकॉट ट्रेंडची सोशल मीडियावर चांगलीच चर्चाही होत आहे. हल्ली, बरेच कलाकार बॉयकॉट ट्रेंडवर(Bollywood Boycott) निर्भिडपणे आपले मत व्यक्त करीत आहेत. यामध्ये एका मराठी कलाकाराने देखील मोलाचा सल्ला दिला आहे. तो कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे(Shreyas Talpade). त्याने बॉयकॉट ट्रेंडवर चिंता व्यक्त केली आहे.
सोबतच अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रतिक्रियांवरही टिका केली आहे. तुम्हाला चित्रपट आवडत नसेल तर तो पाहू नका, असेच थेट आलिया म्हणाली होती. पण "चित्रपट म्हणजे प्रेम आहे आणि हे काम म्हणजे जणू तुमची गर्लफ्रेंड आहे. तुमची गर्लफ्रेंड जर रागवली असेल, तर तिला सोडून जाऊ नका, तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा." असे श्रेयस म्हणाला.
'इक्बाल' ते 'कौन प्रवीण तांबे' यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये भारदस्त भूमिका साकारलेल्या श्रेयसने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉयकॉट ट्रेंडबद्दल आपले मत व्यक्त केले. अर्जुन कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि आमिर खान यांना ज्या पद्धतीने ट्रोल केले गेले, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले त्याबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.
कलाकारांच्या काही विधानांवर टीका करताना श्रेयस म्हणाला, 'सध्या इंडस्ट्रीत जी वक्तव्ये केली जात आहेत ती मला आवडत नाही. इंडस्ट्रिशीतील काही लोक यावेळी जे वक्तव्य करतात त्यावर मी समाधानी नाही. आम्ही सर्व इंडस्ट्रीत काम करतो. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल बाप्पाचे आभार मानले पाहिजेत. अशा स्थितीत जी प्रकारची विधाने येत आहेत, ती मला आवडत नाहीत'.
आपला मुद्दा मांडताना तो पुढे म्हणाला, 'तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल, तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्यावर नाराज असेल, रागावली असेल, तर तुम्ही तिला थेट सोडून देत नाहीत. तुम्ही तिला थांबवता, तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करता. मला वाटतं प्रेक्षकही आमच्यासोबत एका प्रेयसीसारखेच वागतात. ते आमच्यावर रागावले असतील तर त्यांचे मन राखणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण त्यांना त्यामागचे कारण विचारले पाहिजे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा अशी विनंती केली पाहिजे. चित्रपटसृष्टीतील लोकं काहीही म्हटले तरी, मी प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही आमचे काम पहा. तुम्ही आमचे चित्रपट पहा. OTT वर देखील आमची सिरीज पहा. जर प्रेक्षकांनीच आमचे काम पाहिले नाही तर आम्हा कलाकारांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ राहणार नाही.” अशी विनंतीदेखील त्याने केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.