नोएडामध्ये उबर चालकाने महिला प्रवाशांना पाईपने मारण्याची धमकी दिली.
महिलांनी पोलिसांची धमकी दिल्यावर ड्रायव्हर अधिक संतापला आणि “मी पोलिसांना घाबरत नाही” असं म्हणाला.
हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उबर कंपनीने चालकाविरुद्ध कठोर कारवाई आणि नुकसानभरपाईचे आश्वासन दिले.
उबर कॅब चालकाचा नवा कारनामा समोर आला आहे. उबर कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांना गाडीच्या चालकाने त्यांना पाईपने मारण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर तो पाईप घेऊन महिलांच्या अंगावर धावूनही गेला. आणि जेव्हा या महिलांनी ड्रायव्हरला पोलिसांची धमकी दिली, तेव्हा तो आणखी संतापला. “जिथे तक्रार करायची आहे तिथे करा, मी पोलिसांना घाबरत नाही,” असं उलट उत्तर त्याने महिलांना दिलं. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सदर घटना नोएडामध्ये घडली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ५ महिला उबर कॅबने प्रवास करत होत्या. या महिलांना बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनहून सेक्टर १२८ पर्यंत प्रवास करायचा होता. दरम्यान ऑफिसला उशीर होत असल्याने त्यांनी ड्रायव्हरला दुसऱ्या मार्गाने गाडी वळवण्याची विनंती केली. कारण ट्रॅफिकमुळे त्यांना कामावर जायला उशीर होईल अशी भीती त्यांना वाटत होती. पण चालक काही ऐकायला तयार नव्हता. उलट तो महिलांवर ओरडू लागला आणि शिवीगाळ करू लागला.
या प्रकारामुळे महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ड्रायव्हरला पोलिसांची धमकी दिली. मात्र त्यामुळे ड्रायव्हर आणखी भडकला आणि थेट डिकीतून पाईप काढून महिलांच्या अंगावर धावून गेला. “जेलमध्ये गेलो तरी चालेल पण मी तुम्हाला मारेन,” अशा शब्दांत तो धमकावू लागला. ही संपूर्ण घटना महिलांनी मोबाईलमध्ये कैद केली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उबर कंपनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत चालकाविरुद्ध कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. “हा प्रकार चिंताजनक आहे. अशा वागणुकीला आम्ही कधीही पाठिंबा देत नाही. ग्राहकांची सुरक्षितता हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळे या प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करू,” असं कंपनीचं म्हणणं आहे. तसंच, संबंधित महिलांना नुकसानभरपाई देण्याचंही आश्वासन दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.