
हुंड्यासाठी छळातून विवाहितांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना राज्यभरातून समोर येत आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंड्याचा विषय ऐरणीवर आलाय. आता नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. लग्नाच्या १२ दिवसानंतर विवाहितेचा मृत्यू झालाय. हा घातपात असून हुंड्यासाठी तिला विष पाजून मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. (Police register FIR in suspicious death of bride 12 days after wedding in Maharashtra)
मिळालेल्या माहितीनुसार, ताऊबाई चव्हाण (वय २२) असं मृत विवाहितेचं नाव आहे. तिचा विवाह २ जुलै रोजी राठोडवाडी (ता. मुखेड) येथील सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. लग्नानंतर नवविवाहिता ७ जुलै रोजी काही काळ माहेरी राहून ८ जुलै रोजी पुन्हा सासरी परतली. मात्र ९ जुलै रोजी तिच्या सासरकडून माहेरी फोन करून सांगण्यात आलं की, तिला उलट्या होऊ लागल्यात.
सुरुवातीला ताऊबाई यांच्यावर मुखेड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना हैदराबाद येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच १३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केलाय.
हुंड्यासाठी त्यांनी ताऊबाईची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केलाय. एकूण ६ लाख रुपयांचा हुंडा ठरला असताना लग्नात ५ लाख रुपये देण्यात आले होते. उर्वरित १ लाख रुपयांसाठी ताऊबाईचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. अखेर तिला विष देऊन तिचा खून करण्यात आला, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खूण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीसह सासू, सासरे यांना अटक करण्यात आली आहे. विवाहितेला विष पाजन्यात आले का? की तिने स्वतः विष प्राशन केले याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.