Akola News: संशयित आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदाराची बदली, PSIसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Akola News: एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांनी संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या चौकशीदरम्यान पोलिसांनी या आरोपीला अमानुष मारहाणी करण्यात आली होती.
Akola News: संशयित आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदाराची बदली, PSIसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
Akola Newssaam Tv

अक्षय गवळी

अकोला : पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हे यांची बदली झाली असून त्यांना कंट्रोल रुममध्ये पाठवण्यात आलंय. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात PSI सह एका पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन झालंय.

दरम्यान आरोप असलेल्या अकोट शहरातील एका पीएसआय आणि ३ पोलीस कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध अकोट पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल आहेत. सध्यास्थित दोघेही जण ताब्यात असून याचा अधिक तपास सीआयडी करीत आहेत. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण साम'टीव्हीनं उघडकीस आणलं होतं.

दरम्यान सीआयडीकडून या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि आकोट शहर पोलीस निरीक्षक तपण कोल्हे यांची चौकशी सुरूय. चौकशी दरम्यान अडथळा निर्माण होऊ नये, या अनुषंगाने ही बदलीची कारवाई झाल्याची माहिती आयपीएस अनमोल मित्तल यांनी साम'शी बोलतांना दिली. तर सीआयडीचा तपास प्रगतीपथावर असून आणखी आरोपी आहे का? याच तपास केला जातोय, अशी माहिती माहिती CID चे प्रमुख IPSअनिवाश बारगळ यांनी दिलीय.

नेमकं काय घडलं होतंय?

'गोवर्धन हरमकार' असं मृतक संशयित आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे सर्व प्रकरण १६ जानेवारी ते १८ जानेवारीच्या कालावधीत घडलं होतं.

मात्र या एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. अखेर कुटुंबियांनं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय गाठलं. त्यानंतर त्यांनी चौकशी मागणी केली. या प्रकरणात मृतकाच्या वैद्यकीय अहवाल आणि कुटुंबियांच्या तक्रारीनुसार खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे सर पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनाही ताब्यात घेतले असून ते कारागृहात आहे. विशेष म्हणजे विधान परिषदचे उपसभापती नीलम गोर्हे यांनी याप्रकरणी दखल घेत त्यावेळी पोलिसांना गांभीर्यांनं चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

नेमकं कुटुंबियांची तक्रार काय?

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील 'पीएसआय राजेश जवरे' आणि इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला रात्री ८ ते ९ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. तेथे दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली.

या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केलं. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील 'आकाश' नामक व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय.

'ते' पोलीस गेले तरी कुठे?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट पोलीस स्टेशनमधील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, पंचांग, सदांशिव हे कर्मचारी गुन्हे दाखल झाल्यापासून ठाण्यात हजर झाले नाहीये. हे कर्मचारी कुठे गेले? वरिष्ठाना याची कल्पना सुद्धा नाहीये. तर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनीही 'अकोट पोलिसांकडून मला याबाबत काहीही कळवण्यात आले नाही, नक्की चौकशी करतो' अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान हे प्रकरण घडून ३० दिवस उलटून गेलेत. तरी सीआयडीचा तपासही मंदावला आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे सीआयडीच्या तपासावरही मृतकाच्या कुटूंबियांनी शंका उपस्थित केलीय. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणात लक्ष घालून सीआयडीला जाब विचारावा, अशी मागणी कुटुंबियांनी केलीय.

Akola News: संशयित आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदाराची बदली, PSIसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
Yerwada Jail News: धक्कादायक! येरवडा कारागृहातील कैद्यांचा पोलीस हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com