Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?
अनेक ठिकाणी शेती जमीन सामूहिक सातबारा उताऱ्यावर नोंदलेली असते.
स्वतंत्र मालकीसाठी फाळणी किंवा विभाजन प्रक्रिया आवश्यक असते.
तलाठी व तहसील कार्यालयामार्फत स्वतंत्र सातबारा काढता येतो.
बऱ्याच ठिकाणी शेती जमीन एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक नावांनी नोंदलेली असतात. वडिलोपार्जित मालमत्ता, भाऊबंदकीमधील वाटणी किंवा संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे अशी नोंद आढळते. पण जेव्हा शेतीची विक्री, कर्ज, सरकारी योजना किंवा स्वतंत्र मालकी हक्क सिद्ध करायचा असतो, त्यावेळी सातबारा वेगळा असणं आवश्यक असते. सामूहिक सातबारा स्वतंत्र करण्याच्या प्रक्रियेला फाळणी किंवा विभाजन प्रक्रियाही म्हटले जाते.
ही प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत महसूल विभागामार्फत केली जाते. फाळणी प्रक्रिया तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. मात्र मालकांमध्ये वाद असल्यास प्रकरण न्यायालयात जात असते. त्यामुळे जमिनीच्या विभाजनासाठी सर्व सहमालकांमध्ये सहमती असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
महत्त्वाची कागदपत्रे कोणती?
सामूहिक सातबारा उताऱ्याची प्रत,
सर्व सहमालकांचे संमतीपत्र (एनओसी),
आधार कार्ड,
पॅन कार्ड यांसारखी ओळखपत्रे,
जमिनीचा नकाशा आणि वडिलोपार्जित जमीन असल्यास वारसा प्रमाणपत्र किंवा संबंधित पुरावे द्यावे लागतात.
शुल्क दरम्यान तलाठी किंवा तहसील कार्यालयात आकारली जाणारी फी गाव व जिल्ह्यानुसार वेगळी असू शकते, साधारणपणे ५०० ते २००० रुपयांपर्यंत ही फी असते.
अशी होते फाळणी
यासाठी एक अर्ज करावा लागतो. या अर्जात जमिनीचा खाते क्रमांक, एकूण क्षेत्रफळ, सहमालकांची नावे आणि विभाजनाचे कारण सांगावे लागते. काही ठिकाणी महाभूमी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अर्ज अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर तलाठी सर्व संबंधित मालकांना नोटीस बजावतो. ते १५ ते ३० दिवसांचा कालावधी हरकती नोंदवण्यासाठी देतात. जर हरकत असेल त्यावर कार्यवाही होते.
जर एखाद्या मालकाने हरकत घेतली, तर हे प्रकरण मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारांकडे पाठवले जाते आणि त्यावर सुनावणी होत असते. यानंतर जमिनीचे अधिकृत मोजणी केली जाते. या टप्प्यात सर्व्हेयर किंवा भूमापकाच्या मदतीने जमिनीचे मोजमाप केलं जातं.
प्रत्येक सहमालकाचा हिस्सा क्षेत्रफळानुसार निश्चित केला जातो आणि त्यानुसार स्वतंत्र नकाशा तयार केला जातो. ही प्रक्रिया साधारण एक ते दोन महिन्यांत पूर्ण होत असते. जमीन मोजणीचा अहवाल आणि कागदपत्रे तपासल्यानंतर मंडळ अधिकारी विभाजनास मंजुरी देत असतात. त्यानंतर सातबाऱ्यावर फेरफार नोंद घेतली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

