
खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार पगार वाढीसाठी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी जात असतात. पगारासाठी नोकरी बदलणे कधीकधी चांगलं असतं. नवीन ऑफिस, नवीन लोक, नवीन कॅफेटेरिया, नवीन काम आणि पूर्वीपेक्षा जास्त पगार. यामुळे सर्वांना चांगलं वाटतं. परंतु, नोकरी सोडण्याची आणि नवीन नोकरी सुरू करण्याची वेळ योग्य नसल्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
जर तुम्ही आर्थिक वर्ष 2024-25 च्या अखेरच्या आधी म्हणजेच 31 मार्च 2025 पूर्वी नोकरी बदलली असेल, तर आयकर रिटर्न भरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. नाहीतर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतं.
जर तुम्ही आर्थिक वर्षात किंवा ते संपण्याच्या काही दिवस आधी नोकरी बदलली असेल. तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तयारी ठेवावी लागेल. जेव्हा तुम्ही नोकरी बदलता तेव्हा तुम्हाला एकाच आर्थिक वर्षात दोन संस्थांकडून पगार मिळतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या ITR मध्ये दोन ठिकाणांहून मिळालेल्या पगाराचा तपशील द्यावा लागेल.
जेव्हा नवीन कंपनीत नोकरी सुरू करतात. तर तुम्हाला तुमच्या आधीच्या कंपनीची माहिती तुमच्या नवीन कंपनीला द्यावी लागते. तुमच्या आधीच्या कंपनीत तुमचे करपात्र उत्पन्न किती होते? किती पीएफ कापला गेला? किती टीडीएस कापला जात होता आदी गोष्टींची माहिती द्यावी लागते. या कालावधीत तुम्हाला तुमच्या आधीच्या कंपनीकडून किती पगार मिळाला याचीही माहिती द्यावी लागेल. तुम्हाला तुमची सॅलरी स्लिप आणि इतर कागदपत्रे देखील द्यावी लागेल.
पगारदार वर्ग फॉर्म 16 ची माहिती असणे आवश्यक आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी दरवर्षी त्याची गरज असते. कंपनीकडून हा फॉर्म दिला जातो. कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत 15 जूनपर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करणे बंधनकारक असते. जर तुम्हाला तुमच्या जुन्या कंपनीकडून फॉर्म 16 जारी केला गेला नसेल, तर तुम्ही ईमेलद्वारे संपर्क साधून तुमचा फॉर्म 16 मागून घ्या.
दोन्ही कंपन्यांकडून मिळालेला फॉर्म 16 पूर्णपणे तपासून घ्या. भाग B मध्ये तुमच्या एकूण पगाराचा तपशील असतो. यात कर सवलतीचे दावे आणि कराच्या कक्षेबाहेर राहणारे भत्ते यांचाही समावेश असतो.
दोन्ही फॉर्म 16 मध्ये HRA आणि LTA जोडून घ्या. इतर कर सवलती देखील तपासा. हे तुम्हाला कळेल की किती रकमेवर कर सूट मिळू शकते. दरवर्षी 50 हजार रुपयांपर्यंतच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ प्राप्तिकर विभागाकडून मिळतो. एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीकडून फॉर्म 16 मिळालेला नसला तरीही, तो पगाराच्या स्लिपच्या आधारे एकूण पगार जोडून करपात्र रकमेची गणना करू शकतो. यातून तुम्ही इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश करून तुमचे रिटर्न भरू शकता.
जर तुम्ही तुमच्या नवीन कंपनीला जुन्या कंपनीकडून मिळालेल्या पगाराची माहिती दिली नाही किंवा फॉर्म 16 दिला नाही, तर तुमचा नियोक्ता उर्वरित महिन्यांच्या आधारे कराची मोजणी करत असतो. आयकर भरण्यापूर्वी तुमची गुंतवणुकीची कागदपत्रे तयार ठेवा. तुमच्या पगाराचा काही भाग दरमहा निवृत्ती निधीत जमा केला जातो. पाच वर्षे सतत सेवा केल्यानंतर पैसे काढणे हे करपात्र उत्पन्न असते. भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेले पैसे ५ वर्षानंतर करमुक्त होत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.