September Rule Changes: एलपीजी सिलिंडर ते बँकिंग...आजपासून ५ मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम!

September Changes: १ सप्टेंबरपासून देशात ५ मोठे बदल लागू झाले आहेत. यात एलपीजी सिलेंडरची किंमत, क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, पोस्ट ऑफिस सेवा, एटीएफ इंधन आणि बँकांच्या सुट्ट्यांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, याचा थेट परिणाम प्रत्येकाच्या खिशावर होणार आहे.
September Rule Changes: एलपीजी सिलिंडर ते बँकिंग...आजपासून ५ मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम!
Published On

सप्टेंबर २०२५ ची सुरुवात सामान्य लोकांसाठी महत्त्वाच्या बदलांसह झाली आहे. १ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नियमांचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होणार आहे. यामध्ये सर्वात दिलासादायक निर्णय म्हणजे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून ग्राहकांना स्वस्त गॅस मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे एक धक्कादायक निर्णय एसबीआय कार्डकडून घेण्यात आला आहे. बँकेने काही निवडक क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सची सुविधा बंद केली आहे. या व्यतिरिक्त आणखी काही बदल झाले आहेत, जे थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणार आहेत.

पहिला बदल: LPG सिलेंडर स्वस्त

सप्टेंबरच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो सिलेंडरची किंमत ५१.५० रुपयांनी कमी केली. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत नवीन दर लागू झाले आहेत. मात्र, घरगुती १४ किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही.

दुसरा बदल: विमान प्रवास स्वस्त

१ सप्टेंबर २०२५ पासून विमान इंधनाच्या (ATF) किमतीत घट झाली आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे नवीन दर लागू झाले असून विमान कंपन्यांचा खर्च कमी होईल. त्यामुळे हवाई प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये मात्र ३% वाढ झाली होती.

तिसरा बदल: एसबीआय क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

एसबीआय कार्डधारकांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, लाइफस्टाइल होम सेंटर एसबीआय कार्ड, सिलेक्ट आणि प्राइम कार्डवर काही व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स बंद करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, सरकारी पोर्टल्स आणि व्यापारी व्यवहारांवर आता कोणतेही रिवॉर्ड्स मिळणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे.

चौथा बदल: भारतीय पोस्टच्या नियमात बदल

१ सप्टेंबर २०२५ पासून पोस्ट विभागाने मोठा बदल लागू केला आहे. देशांतर्गत पोस्टल सेवेत नोंदणीकृत पोस्टला स्पीड पोस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता नोंदणीकृत पोस्टही स्पीड पोस्टसारखीच पाठवली जाईल आणि डिलिव्हरी मिळेल. इंडिया पोस्टमधील सर्व नोंदणीकृत पोस्टसाठी ही सुविधा लागू होणार आहे.

पाचवा बदल: बँकांमध्ये बंपर सुट्ट्या

सप्टेंबरमध्ये बँकिंग कामकाजासाठी जाण्यापूर्वी सुट्टींची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. आरबीआयच्या नियमानुसार या महिन्यात वेगवेगळ्या राज्यांतील सण आणि कार्यक्रमांमुळे तब्बल १५ दिवस बँका बंद राहतील. मात्र, ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही कारण इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल सेवा २४x७ सुरू राहणार असून घरबसल्या व्यवहार करता येतील. बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण माहिती आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) सहजपणे पाहता आणि तपासता येईल.

सप्टेंबर महिना या कामांसाठी देखील खास आहे.

१ सप्टेंबरपासून लागू झालेल्या बदलांव्यतिरिक्त, सप्टेंबर २०२५ अनेक महत्त्वाच्या कामांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आयकर विभागाने आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३० जुलैवरून १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तसेच, एनपीएसअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याशिवाय, इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकांच्या विशेष एफडी योजनांमध्ये (४४४, ५५५ व ७०० दिवस) गुंतवणुकीची अंतिम तारीखही ३० सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com