आपला चेहरा व्हायरल होतो तेव्हा...

'लाऊडस्पीकर वाजवण्यावरुन पोलिस आयुक्त माझ्यावर संतापले नव्हतेच'; जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य.
Pune Viral Photo
Pune Viral PhotoSaam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे: सकाळी ७ पासून रात्री दोन पर्यंत काम करून घरी पोहोचले आणि दमल्यामुळे साहजिकच लगेच झोप लागली. पण सकाळ झाली ती सतत वाजत असलेल्या फोनमुळे. मी जिथे काम करते ते सोडून जवळपास सगळ्या चॅनलवर, वेब पोर्टलवर शनिवारी माझा चेहरा झळकत होता.

कॉमेंट बॉक्समध्ये कोण आहे ती दात विचकणारी बाई इथपासून ते तमाशा पार्टीतली दिसतेय इथपर्यंत तऱ्हे-तऱ्हेच्या कॉमेंट्सचा पाऊस प्रत्येक पोस्टवर पडलेला होता. अनेक ठिकाणी हसणारा माझा चेहरा आणि समोर रागावलेला पोलिस कमिशनर यांचा चेहरा असे फोटो थंबनेल म्हणून झळकत होते. सकाळपासून फोन तर सतत खणखणत होता. तर तीच हसणारी बाई म्हणजे कोण? हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तीच बाई मी असून प्रत्यक्षात काय झालं ते सर्वांना सांगत आहे.

Pune Viral Photo
सामान्य जनतेला कामांसाठी मंत्रालयात येण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला नवे आदेश

ज्या मंडळावरून वाद झाला ते नवनाथ मंडळ, मी स्टुडिओमधून अलका चौकात आले तेव्हा कुमठेकर रोडवरून जवळपास अलका टॉकीज चौकात आलं होतं. त्याच्या आधी काय घडलं याची मला अजिबातच कल्पना नव्हती. मी आले तेव्हा ते मंडळ चौकात येत होतं. त्यानंतर त्या मंडळाचा अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक पोटे स्टेजवर आले. तेव्हा त्यांना माझ्या शेजारी उभ्या असणाऱ्या एका न्यूज चॅनलच्या (News Channel) पत्रकाराने तिथे असलेल्या इतर पत्रकार आणि पीआर लोकांना नाचायचं आहे म्हणत स्पीकरवर गाणं लावायची विनंती केली.

सुरुवातीला नकार दिल्यानंतर मग या नगरसेवकानी माईक वरून गाणं लावायला सांगितलं. अवघ्या दोन-तीन ओळी वाजवून ते गाणं थांबलंही. तेव्हा इतर चॅनलचे सहकारी आणि पीआर गाणं का बंद केलं गाणं लावा असा आवाज देत होते. यानंतर अगदी काही सेकंदात सिपी स्टेजवर आले.

तोपर्यंत संबंधित नगरसेवक (Corporator) आणि ज्यांनी गाणं लावायला सांगितलं तो पत्रकार दोघंही स्टेज वरून गायब झालेले होते. तिथे महापालिकेच्या मंडपात अधिकाऱ्यांसोबत बसलेल्या एका वृत्तापत्रच्या पत्रकारांशी कमिशनर अमिताभ गुप्ता (Commissioner Amitabh Gupta) काही काळ बोलले. ते वळून पुन्हा खाली जात असताना माझ्या शेजारी आल्यावर ते तिथे आल्याचं मी पाहिलं, त्यानंतरच दृश्य सगळ्या चॅनलवर झळकत होतं.

पाहा व्हिडीओ -

पाहिल्यावर असं वाटावं की मी काही बोलले म्हणून ते माझावर चिडले आहेत. पण प्रत्यक्षात झालेला संवाद होता तो असा होती की, मी त्यांना समोर असलेल्या पत्रकार मंडळींकडे हात करत म्हणलं की, 'सर नाचना था सबको, आणि त्यानंतर ते म्हणाले तो 'नाचो ना फिर, इतकाच संवाद. चेहऱ्यावरून शांत दिसणाऱ्या कमिशनर अमिताभ गुप्ता यांचा असं व्यक्त होणं हा त्यांचा स्वभाव आहे.

अनेक मुद्द्यांवर मी घेतलेल्या मुलाखतींमध्ये बोलताना अशाच पद्धतीने ते या पूर्वी सुद्धा व्यक्त झालेले आहेत. यात ना दोघांपैकी कोणी चिडले ना कोणी कोणाला उलट बोललं आणि जर खरंच असं काही झालं असतं तर माझी प्रतिक्रिया अर्थातच हसण्याची नव्हे तर त्याला उत्तर देण्याची असली असती.

आजपर्यंत पत्रकारितेच्या १४ वर्षात कोणत्याच अधिकारी किंवा राजकारणी कोणाचाच ओरडा ऐकून घेण्याचा काही संबंध आला नाही. चूक नसेल तर तातडीने उत्तर देऊन मोकळं होणं, कोणतीही बातमी बिनधास्त मांडणं हा माझा स्वभाव आहे. मला ओळखणाऱ्या अनेकांना माहिती आहे की असं काही घडलं तर मी मागं हटत सुद्धा नाही.

Pune Viral Photo
संतापजनक! बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाला कंडक्टरने घातली लाथ; घटनेचा Video व्हायरल

अगदी मुंबईत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री आले तेव्हा मुंबई पोलिसांनी दिलेला त्रास आणि त्यावर त्यांना थेट लाईव्ह विचारलेले सवाल असो किंवा एखाद्या राजकारण्याचा एखादा मुद्दा पटला नाही तर थेट ऑन एअर वाद घालणं असो. त्यामुळे गुप्ता सर चिडून बोलले तर प्रत्यूतर न देणं हे शक्य नव्हतंच.

खरंतर काल संध्याकाळी ते पुन्हा भेटले तेव्हा याच दृष्यांबद्दल बोलून आम्ही दोघंही हसत होतो. असो हा शूट झालेला व्हिडिओ जेव्हा तिथल्या सहकाऱ्यांनी दाखवला तेव्हा त्यांना मी प्रत्यक्षात काय झालं ते सांगितलं सुद्धा. पण तरीही बातमी झळकली आणि त्यात मी ही, थोडक्यात काय तर या प्रकारात तसा काहीही संबंध नसताना मला भरपूर स्क्रीन टाईम मिळाला हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com