भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४४५ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने देखील ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आर अश्विनने कौटुंबिक कारणास्तव माघारी घेतली आहे. दरम्यान तो बाहेर होण्याचं नेमकं कारण समोर आलं आहे.
राजकोट कसोटीतील दुसऱ्या दिवशी आर अश्विनने झॅक क्रॉलीला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड केला. मात्र दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर बीसीसीआयने अश्विनबाबत मोठी अपडेट दिली. आर अश्विन तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ' आर अश्विन कौटुंबिक कारणास्तव कसोटीतून बाहेर झाला आहे. या कठीण काळात बीसीसीआय आणि भारतीय संघ अश्विनच्या पाठीशी आहे. गरज पडल्यास बीसीसीआय हवी ती मदत करण्यास तयार आहे.' (Cricket news in marathi)
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्विट करत, आर अश्विन माघारी का परतला याचं खरं कारण सांगितलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, आर अश्विनच्या आईच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे.
त्यामुळे त्याला कसोटी सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. मात्र त्याच्या आईला नेमकं काय झालं आहे, याबाबत त्यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही. राजीव शुक्ला यांनी पोस्ट शेअर करत लिहीले की, 'अश्विनची आई लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करतो. त्याला आपल्या आईची काळजी घेण्यासाठी राजकोट कसोटी सोडून चेन्नईला परतावं लागलं आहे.'
आर अश्विन या सामन्यातून बाहेर झाल्यानंतर भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण आता भारतीय खेळाडूंना १० खेळाडूंसह खेळावं लागणार आहे. भारतीय संघला अतिरिक्त क्षेत्ररक्षक मिळेल. मात्र एक गोलंदाज कमी पडेल. आता फिरकी गोलंदाजीची धुरा रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादववर असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.