भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज गोलंदाज एस श्रीसंतच्या अडचणी वाढल्या आहेत. केरळ क्रिकेट असोसिएशननं (KCA) त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली आहे. श्रीसंतवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी कोच्चीमध्ये संघटनेची सर्वसाधारण सभा झाली होती. त्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. श्रीसंत सध्या केरळ क्रिकेट लीगमध्ये कोल्लम एरीस टीमचा सहमालक आहे.
एस श्रीसंत यानं टीम इंडियाचा सलामीवीर आणि सध्या राजस्थान रॉयल्स संघात खेळणाऱ्या संजू सॅमसनबाबत वक्तव्ये करताना केसीएवर गंभीर आरोप केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाच्या चमूत संजू सॅमसनला संधी मिळाली नव्हती. त्यावरून त्याने केसीएवर टीका केली होती. श्रीसंतने संघटनेविरोधात कथितरित्या गंभीर आणि खोटी, तसेच अपमानास्पद वक्तव्ये केली होती. एका टीव्ही चॅनलवर चर्चेत सहभागी होताना, संजू सॅमसनच्या समर्थनार्थ मत व्यक्त करतानाच संघटनेवर गंभीर आरोप केले होते.
केरळ क्रिकेट असोसिएशनने एस श्रीसंतवर कठोर करवाई केली. यापूर्वी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सॅमसनचं समर्थन केल्यामुळे ही नोटीस नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी संघटनेने दिले होते. संघटनेविरोधात खोटेनाटे आरोप आणि अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळं ही नोटीस बजावली होती, असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले होते.
विशेष म्हणजे, नोटीस बजावल्यानंतरही श्रीसंत याने माघार घेतली नाही. एका मुलाखतीत त्याने संघटनेवर कठोर शब्दांत टीका केली होती. इतर राज्यांतून क्रिकेटपटूंना केरळमध्ये खेळण्यासाठी आणतात. ते कशाला? आमच्या स्थानिक क्रिकेटपटूंचा अपमान केला जात आहे, असं तो म्हणाला होता.
संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ च्या आधीच केरळ क्रिकेट संघाच्या सराव शिबिरात सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळच्या संघात त्याला संधी देण्यात आली नव्हती. केसीएच्या या निर्णयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवडीच्या शक्यतेवर परिणाम झाला होता, असे बोलले जात होते. यावरून श्रीसंत याने संघटनेविरोधात वक्तव्ये केली होती. श्रीसंतसह कोल्लम टीम, अलपुझा टीम लीड कंटेंट क्रिएटर साई कृष्णन आणि अलपुझा रिपल्सला देखील कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
फ्रेंचाइजींनी नोटिशीला समाधानकारक उत्तरे दिली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण संघटनेने दिले होते.
श्रीसंतची क्रिकेट कारकीर्द
४२ वर्षीय श्रीसंत याआधीही अनेक वादात अडकला आहे. आयपीएल २०१३ मध्ये कथितरित्या स्पॉट फिक्सिंगमध्ये त्याचं नाव आलं होतं. त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०२० मध्ये बीसीसीआयने प्रतिबंध हटवून सात वर्षे केली होती. श्रीसंत हा २००७ चा टी २० वर्ल्डकप आणि २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चॅम्पियन ठरलेल्या टीम इंडियात खेळला होता.
श्रीसंत भारतासाठी २७ कसोटी, ५३ वनडे आणि १० टी २० सामने खेळला होता. त्यात त्याने एकूण १६९ विकेट घेतल्या. श्रीसंतने किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो कोच्ची टस्कर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाकडूनही खेळला होता. श्रीसंतने एकूण ४४ आयपीएल सामन्यात ४० विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.