पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेच्या सहाव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली. मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने भारताला शूटिंगमध्ये तिसरं पदक जिंकून दिलं. त्याने ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला. शूटिंगमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंना रिकाम्या हाती परतावं लागलं आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला उपांत्यपूर्व फेरीक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला बॅडमिंटनमध्ये उपांत्यफेरीत जाण्याची सुवर्णसंधी होती. मात्र उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीला चिआ आरोन आणि वूई यिक या मलेशियन जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय जोडीला मलेशियाकडून १३-२१, २१-१४आणि २१-१६ ने गमवावा लागला आहे. मुख्य बाब म्हणजे या जोडील पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र या जोडीचं पदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी बाजी मारत मलेशियन जोडीला बॅकफूटवर टाकलं होतं. पहिल्या सेटमध्ये भारतीय संघाने २१-१३ ने विजय मिळवला. यासह १-० ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियन जोडीने दमदार कमबॅक केलं. हा सेट भारतीय जोडीला २१-१४ ने गमवावा लागला. १-१ च्या बरोबरीत आल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार हे निश्चित होतं आणि असंच काहीसं पाहायला मिळालं. एकवेळ दोन्ही देशातील खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत सुरु होती. शेवटी मलेशियन जोडीने २१-१६ ने बाजी मारत हा सामना जिंकला.
भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत ३ पदकं जिंकली आहेत. हे तिन्ही पदकं शूटिंगमध्ये मिळवली आहेत.सुरुवातील मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. त्यानंतर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. आज महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल ३ पोझिशन शूटिंग प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.