Mumbai Indians Vs Punjab Kings saam tv
Sports

MI Vs PBKS : मुंबई इंडियन्सची ती एक चूक अन् सामना पंजाबच्या बाजूने फिरला, मैदानाबाहेर आणि मैदानात नेमकं काय घडलं?

Mumbai Indians Vs Punjab Kings Highlights : श्रेयस अय्यरच्या तडाखेबंद ८७ धावांच्या जोरावर पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्जनं पराभव केला. मुंबईच्या पराभवाला त्यांची एक चूक कारणीभूत ठरली.

Nandkumar Joshi

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्याच काय तर, होते नव्हते सगळेच गोलंदाज श्रेयस अय्यरच्या विस्फोटक फलंदाजीपुढं आधीच हरले होते. अखेरचा षटकार आणि त्यासह मिळणारा विजय ही केवळ औपचारिकता उरली होती. एकट्या श्रेयसच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जनं बलाढ्य मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. आयपीएलचं पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.

मुंबई इंडियन्सचा पराभव का झाला, कुठं चुकलं? या चर्चा आयपीएलचा 'ताप' उतरत नाही तोपर्यंत सुरूच राहतील. हार्दिक पंड्यानंही पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. खेळाडूंना आणखी उत्तम आणि योग्यरित्या मॅनेज केलं असतं तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, असं सांगून तो मोकळाही झाला. गोलंदाजांनी जशी कामगिरी करायला हवी होती, ती करू शकले नाहीत, असंही तो म्हणाला. आता पराभवाचं खापर फोडायला निमित्त कुणीतरी असणारच यात शंकाच नाही. दुसरीकडे आता सामन्यातल्या एका 'टर्निंग पॉइंट'ची जबरदस्त चर्चा सुरू आहे.

चॅम्पियन मुंबईला धुळ चारली

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूंत ८७ धावा कुटल्या. त्या जोरावर पंजाबनं बलाढ्य मुंबईला धुळ चारली. श्रेयसला नेहाल वढेरानं चांगली साथ दिली. या दोघांच्या भागीदारीनं पंजाबच्या विजयाचा पाया रचला गेला. तत्पूर्वी, अय्यरनं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. रोहित शर्मा लगेच बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव यानं २६ चेंडूंत ४४ धावा ठोकल्या. तर तिलक वर्मा यानं २९ चेंडूंत ४४ धावा केल्या. त्या जोरावर मुंबईच्या संघानं ६ बाद २०३ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची मागील काही सामन्यांतील कामगिरी बघता हा सामना सहज जिंकून फायनलमध्ये धडक देतील असं सगळ्यांनाच वाटत होते. त्याप्रमाणे सुरुवातही झाली. पंजाबचे सलामीवीर प्रभसिमरन आणि प्रियांश आर्या हे स्वस्तात माघारी परतले. प्रियांशला फक्त २० धावा करता आल्या. तर प्रभसिमरन अवघ्या सहा धावा करून तंबूत परतला. जोश इंग्लिस यानं मुंबईच्या गोलंदाजांना हादरे द्यायला सुरुवात केली. त्यानं दोन उत्तुंग षटकार ठोकले. तसेच पाच चौकार तडकावले. पण ३८ धावांवर खेळत असताना हार्दिकनं चातुर्यानं त्याला तंबुचा रस्ता दाखवला. त्यानंतर पंजाब किंग्जचा डाव घसरेल आणि मुंबई इंडियन्स सामन्यावर कब्जा करेल, असं वाटलं होतं. पण त्यानंतर भलतंच घडलं.

मुंबईचं चुकलं कुठं? कलाटणी नेमकी कधी मिळाली?

श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा यांनी चांगली फलंदाजी केलीच, पण त्याचबरोबर मुंबई इंडियन्सनंही काही चुका केल्या. विशेष करून नेहाल वढेराची कॅच सोडणं मुंबईला महागात पडलं. पंजाबनं ७२ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या. मुंबई इंडियन्सला पंजाबवर दबाव आणण्याची ती संधी होती. हार्दिक पंड्यानं ती संधी निर्माणही केली. १० व्या षटकात नेहाल वढेराला स्लोअर बाउंसर मारला. नेहालनेही पूल फटका मारला. ट्रेंट बोल्टकडे झेल उडाला होता. पण त्याच्या हातून तो निसटला आणि नेहालला जीवदान मिळालं. हा झेल सुटला त्यावेळी नेहाल अवघ्या १३ धावांवर खेळत होता. संघाची धावसंख्या अवघी ९४ होती. नेहालनं नंतर संधीचं सोनं केलं. पुढच्या २२ चेंडूंत त्यानं ३५ धावा कुटून मुंबईलाच त्यांची चुकीची शिक्षा दिली. नेहालने ४८ धावा केल्या.

तो एक निर्णय अन् सामना फिरला

पंजाब किंग्जला अखेरच्या आठ ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी ९५ धावांची गरज होती. मैदानात श्रेयस अय्यर होता. त्याचा चांगलाच जम बसला होता. पण तरीही मुंबई इंडियन्सचे गोलंदाज कमबॅक करून सामना फिरवतील अशी अपेक्षा होती. कारण, १२ व्या षटकापर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती. पंजाबच्या फलंदाजीला त्यांनी वेसण घातल्याचं चित्र होतं. मुंबई इंडियन्सचा सर्व स्टाफ फुल्ल जोशात होता. कोचिंग स्टाफही मैदानाबाहेर असला तरी, जणू मैदानातच उतरला होता. प्रत्येक चेंडूवर हातवारे करून रणनीती सांगत होता. पण हाच जोश आणि त्यातून घेतलेला निर्णय संघाच्या अंगलट आला असं मानलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आठ षटकांत ९५ धावांची गरज असताना, मैदानाबाहेरून जयवर्धने यानं हार्दिक पंड्याला काही सूचना केल्या. तेरावी ओव्हर टॉप्लीला द्यावी, असं त्यानं सांगितलं. पण या एका निर्णयानं अख्ख्या सामन्याचं चित्र बदललं. श्रेयस अय्यरनं टॉप्लीला सलग तीन चेंडूंवर तीन षटकार खेचले आणि मुंबई इंडियन्सच्या तावडीतून सामनाही खेचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT