DC vs GT IPL 2023 Match Result : राशिद खान आणि मोहमद शमीचा भेदक मारा आणि साई सुदर्शनची सावध खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सचा हा सलग दुसरा विजय असून या विजयासह त्यांनी पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. दिल्लीतील अरूण जेलली मैदानावर नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीने गुजरातला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गुजरातने १८.१ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्या पूर्ण केले.
दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३२ चेंडूत ३७ तर उपकर्णधार अक्षर पटेलने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. सरफराज खान ३० आणि अभिषेक पोरेलने २० धावा करून बाद झाले. १० पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी घातक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. तर अल्झारी जोसेफला २ विकेट मिळाल्या.
दरम्यान, १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलामी जोडी साहा आणि गिल दोघेही प्रत्येकी १४-१४ धावांवर बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्याही लवकर बाद झाला. तो ५ धावा करुन तंबूत परतला. एकवेळ गुजरातची अवस्था ८ षटकात ३ बाद ६६ झाली होती.
मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या साई सुदर्शनने विजय शंकरच्या साथीने सावध खेळी केली. दोघांनी मिळून चांगली भागीदारी केली. विजय शंकर २३ चेंडूत २९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या मिलरने साई सुदर्शनची चांगलीच साथ दिली. मिलरने मैदानावर फटकेबाजी करून गुजरातला विजय मिळवून दिला. त्याने १६ चेंडूत ३१ धावा कुटल्या.
मात्र, गुजरातच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो साई सुदर्शन. त्याने शेवटपर्यंत मैदानावर तंबू गाडत फलंदाजी केली. साई सुदर्शनने ४८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दिल्लीकडून ऑनरिक नॉकियाने २ बळी घेतले. खलील अहमद, कुलदीप यादव, मिचेल मार्शने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.