भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. मात्र तिसरा सामना हा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाला आपली बेंच स्ट्रेंथ आजमावून पाहण्याची संधी असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी अशी की, कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे. तर रोहित आणि शुभमनची सलामी जोडी दमदार कामगिरी करत आहे. रोहितने दुसऱ्या वनडेत ९० चेंडूत ११९ धावांची खेळी केली. एकीकडे रोहित हिट ठरला, तर विराट स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे येणाऱ्या सामन्यात विराटकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली गेली. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आलेला नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला. आता तिसऱ्या वनडेत त्याच्या जागी रिषभ पंतला संधी दिली जाऊ शकते.
भारतीय संघात अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजासारखे अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसह फलंदाजीतही बहुमूल्य योगदान देताना दिसून येत आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोघांनाही खेळवलं तर मग वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवपैकी एकाला संधी मिळू शकते.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मात्र त्याला फार सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. हा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.