भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यानं करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. हार्दिकने मुंबई सोडली असून, त्यानं ट्रेनिंग बेस बेंगळुरूला शिफ्ट केले आहे. भारतीय संघ, आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यग्र नसल्यास तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलन्समध्ये असणार आहे. हार्दिकच्या या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हार्दिकने मुंबई सोडण्याचा घेतलेला हा निर्णय त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. पण दुखापतींशी सामना करणाऱ्या या क्रिकेटपटूसाठी क्रिकेट करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पंड्या हा त्याच्या अष्टपैलू कामगिरीबरोबरच फिटनेसवरूनही चर्चेत आहे.
खरे तर त्याच्यासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. यामुळे त्याला महत्वाच्या सामन्यांना मुकावे लागले आहे. तर भारतीय संघातही त्याचे स्थान डळमळीत झाले आहे. कधी पायाची दुखापत, कधी पाठिच्या दुखण्यामुळं तो संघाबाहेर राहिला आहे. अनेक महत्वाच्या मालिका आणि स्पर्धांमध्ये तो खेळू शकलेला नाही. त्याचमुळे आता त्याने यापुढे पूर्णपणे फिट राहण्याची योजना आखली आहे.
हार्दिक पंड्या हा मूळचा बडोद्याचा राहणारा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहत होता. मुख्यतः तो मुंबई इंडियन्सच्या हायपरफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करत होता. सूत्रांनुसार, लोअर परळस्थित घरातून रोज ट्रेनिंगसाठी प्रवास करणे त्याच्यासाठी जिकिरीचे झाले होते. दुसरीकडे, बेंगळुरूस्थित सीओईमध्ये त्याला जागतिक स्तरावरच्या मेडिकल सुविधा, रिकव्हरी, फिटनेस आणि स्किल ट्रेनिंगसारख्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे त्याने बेंगळुरच्या बाहेर आणि सीओईच्या जवळपासच एक घर भाड्याने घेतले असून, तिथेच स्थायी स्वरुपाचं ट्रेनिंग बेस तयार केले आहे.
आतापर्यंत भारतीय संघातील करारबद्ध खेळाडू आवश्यकता भासल्यास सीओईमध्ये जात होते. दुखापत झाल्यास रिहॅबिलिटेशन, फिटनेस टेस्ट किंवा भारतीय संघाच्या कॅम्पवेळी सेंटरमध्ये जात होते. पण हार्दिक ही परंपरा बदलणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आता त्याचा नियमित सराव, रिकव्हरी आणि फिटनेस प्रोग्राम याच सेंटरमध्ये होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिकला पुढील पाच ते सहा वर्षे भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळायचे आहे. त्यानुसार त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हार्दिक पंड्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळेच तो यूके दौऱ्यावर नाही. मागील सहा महिन्यांतील बराचसा वेळ त्याने सीओईमध्ये रिहॅबिलिटेशन आणि फिटनेस ट्रेनिंगसाठी घालवला आहे. दरम्यान, काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने काही दिवसांचा ब्रेकही घेतला होता. आता एक ते दोन दिवसांत तो पुन्हा बेंगळुरूत परतणार असून, रिकव्हरीसाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.