भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. आधी नागपूर आणि आता कटकच्या मैदानावर विजय मिळवून भारताने वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
ही मालिका आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मात्र ही मालिका सुरु असतानाच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेल हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. यासह तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात जेकब बेथेलला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली नव्हती. स्काय स्पोर्ट्सने बेथेलच्या दुखापतीबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितले की, बेथेलने डाव्या हॅमस्ट्रिंगचा स्कॅन केला आहे. ज्यात तो दुखापतग्रस्त असल्याचं दिसून आलं आहे.
जेकब बेथेलची दुखापत ही इंग्लंडसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. जेकबला दुखापतीतून पूर्णपणे फिट होण्यासाठी कमीत कमी ४ ते ६ आठवड्यांचा अवधी लागणार आहे.
इंग्लंडचा पहिला सामना २२ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. भारतीय संघाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेसाठी जेकब बेथेलच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या जागी टॉम बेंटनचा समावेश करण्यात आला आहे.
जेकब बेथेलबद्दल बोलायचं झालं, तर त्याने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासाठी पदार्पण केलं होतं. इतक्या कमी कालावधीत त्याने इंग्लंडचा प्रमुख खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवलं आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी बेथेलची जागा भरुन काढणाऱ्या खेळाडूचा शोध घेणं हे, इंग्लंड संघाच्या टीम मॅनेजमेंटसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र १२ फेब्रुवारीपर्यंत संघात फेरबदल करण्याची संधी असणार आहे. त्यानंतर संघात बदल करता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.