आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान संघालाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र स्पर्धा सुरु होताच या संघाला मोठा धक्का बसला. पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत दुहेरी धक्का दिला. या सुमार कामगिरीनंतर बाबर आझमला कर्णधापदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझमने संघाकडून झालेल्या चुकांबाबत भाष्य केलं आहे.
पाकिस्तानचा टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला. या सामन्यातही पाकिस्तानने रडत रडत विजय मिळवला. १०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने ७ फलंदाजांना गमावून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयानंतर पाकिस्तानने २ गुणांची कमाई केली. मात्र हे गुण पाकिस्तानला सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवून देण्यास पुरेशे नव्हते. त्यामुळे पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बाबर आझम म्हणाला की, ' जितकं दु:ख तुम्हाला झालं आहे, त्याहून अधिक दु:ख आम्हाला खेळाडूंना आणि टीम मॅनेजमेंटला झालं आहे. आम्हाला ज्याप्रकारचं क्रिकेट खेळायचं होतं, त्याप्रकारचं क्रिकेट आम्ही खेळू शकलो नाही. कुठल्या एका खेळाडूला टार्गेट करुन चालणार नाही. संपूर्ण संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. माझ्या मते आम्हाला हवी तशी फलंदाजी करता आली नाही. मी सर्व खेळाडूंच्या जागी जाऊन खेळू शकत नाही. त्यामुळेच आम्हाला मोठ्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.'
तसेच संघाच्या नेतृत्वाबाबत बोलताना तो म्हणाला की,' तुम्ही जर नेतृत्वाबाबत बोलत असाल, तर मी आधीच कर्णधारपद सोडलं होतं. मला वाटलं होतं की, आता संघाचं नेतृत्व करायला नको. त्यावेळी मी स्वत: याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर पीसीबीने पुन्हा एकदा निर्णय घेतला. आता आम्ही पुन्हा जाऊ आणि इथे जे काही झालं आहे, त्यावर चर्चा करु. त्यानंतर जर नेतृत्व सोडायचं असेल, त मी स्वत:हून सांगेल. आतापर्यंत मी विचार केलेला नाही.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.