Sugar Price Hike saam tv
देश विदेश

Sugar Price Hike: साखरेचे दर अचानक का वाढले? 'ही' कारणं ठरली जबाबदार, केंद्र सरकारने दिली मोठी माहिती

Sugar Price Rise: साखरेच्या वाढत्या दरासाठी इथेनॉलला जबाबदार धरता येणार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. कमी साखर उत्पादन, वाढती मागणी, हवामानाचा परिणाम आणि जागतिक बाजारातील तुटवडा यामुळे दर वाढल्याचं सरकारचं म्हणणं आहे. साखर आयातीसह सरकारच्या उपाययोजनांवरही लक्ष आहे.

Surabhi Jayashree Jagdish

देशात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर या दरवाढीसाठी इथेनॉलला जबाबदार धरणं केंद्र सरकारने नाकारलंय. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादा घातल्या आहेत. तसंच शुल्क न आकारता साखर आयात करण्याची परवानगीही दिलीये. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचा पुरवठा आणखी वाढणार आहे. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होईल, असा सरकारचा दावा आहे.

इथेनॉलसाठी आता धान्याचा मोठ्या प्रमाणात वापर

उपभोक्ता व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने स्पष्ट केलंय की, साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल हे कारण मानता येणार नाही. 2022-23 मध्ये साखरेपासून इथेनॉल तयार करण्यासाठी एकूण साखर उत्पादनापैकी सुमारे 12 टक्के साखर वापरली जात होती. आता 2025-26 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 9 टक्क्यांवर आलंय.

त्याचबरोबर देशात तयार होणाऱ्या इथेनॉलपैकी जवळपास 75 टक्के इथेनॉल आता धान्यापासून तयार होतं. यामध्ये विशेषतः मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे साखरेच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीसाठी इथेनॉलला जबाबदार धरता येणार नाही, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

मग साखरेचे दर का वाढले?

साखरेच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. यंदा देशातील साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. त्यातच सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढलीये. गारपीट, पाऊस आणि इतर हवामानातील बदलांमुळे काही भागांत ऊस पिकांचं नुकसान झालंय. या सर्वांचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला.

याशिवाय जगभरातील साखरेचा पुरवठा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर वाढले आहेत. काही व्यापारी आणि उद्योगातील घटकांकडून साठेबाजी तसंच सट्टेबाजी होत असल्याचाही सरकारने आरोप केलाय. या कारणांमुळे देशातील साखरेच्या किमतीवर दबाव वाढला असल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

साखरेचं उत्पादन अंदाजापेक्षा कमी

सरकारच्या माहितीनुसार, यंदाच्या साखर हंगामात देशात सुमारे 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला हे उत्पादन 343 लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

म्हणजेच सुरुवातीच्या अंदाजापेक्षा उत्पादन लक्षणीय कमी झालंय. मात्र उत्पादन घटलं असलं तरी देशातील घरगुती गरज भागवण्यासाठी पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध आहे, असा सरकारचा दावा आहे. ऑक्टोबरमध्ये नवीन गाळप हंगाम सुरू होईपर्यंत देशातील साखरेची गरज भागवता येईल, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

सरकारने आणखी एक महत्त्वाची बाब सांगितलीये. साखरेचे दर केवळ भारतातच वाढलेले नाहीत तर जगभरात साखरेच्या किमती वाढतायत. जागतिक बाजारात सुमारे 33 लाख मेट्रिक टन साखरेची कमतरता निर्माण होण्याचा अंदाज आहे.

इथेनॉलमुळे साखर कारखान्यांना आधार

सरकारच्या म्हणण्यानुसार, देशातील साखर उद्योगासाठी इथेनॉलचा कार्यक्रम फायदेशीर ठरला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला असून साखर कारखान्यांची आर्थिक स्थितीही मजबूत झाली आहे. देशात साधारणपणे दरवर्षी 320 ते 340 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होतं. तर देशातील साखरेचा वापर सुमारे 280 ते 290 लाख मेट्रिक टन इतका आहे.

जेव्हा साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त होतं तेव्हा अतिरिक्त साखरेचा मोठा साठा कारखान्यांकडे पडून राहतो. त्यामुळे कारखान्यांचे पैसे त्या साठ्यात अडकतात. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे देण्यासही उशीर होऊ शकतो.

अशा परिस्थितीत अतिरिक्त साखरेचा काही भाग इथेनॉल तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे साखरेचा अतिरिक्त साठा कमी होण्यास मदत होते आणि कारखान्यांची आर्थिक अडचणही कमी होते, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

ई-20 धोरणावरून काँग्रेसचा सरकारवर निशाणा

दरम्यान काँग्रेसने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या ई-20 धोरणाविरोधात काँग्रेस अधिकच आक्रामक झालंय. काँग्रेसने केंद्र सरकारकडे ई-20 धोरणाचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी केलीये. तसंच ग्राहकांना इथेनॉल न मिसळलेलं पेट्रोल उपलब्ध करून द्यावं, अशी मागणीही करण्यात आलीये.

काँग्रेसचा आरोप आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या या धोरणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. एका बाजूला प्रवासाचा खर्च वाढत असून दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघरातील खर्चही वाढत आहे, असा पक्षाचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Rahul Gandhi Today Live : पुणे शहरात राहुल गांधींच्या स्वागतासाठी शहरभर पोस्टर आणि फ्लेक्स

Heart Attack : क्षणिक राग ठरू शकते हार्ट अटॅकचे कारण, दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

PM Kisan Yojana: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 येणार? नेमकं सत्य काय?

Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा सोने इतक्या रुपयांनी महागले; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT