कानपूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे बरखा गुप्ता यांचा मृत्यू.
रुग्णालयात पोहोचण्यास ४५ मिनिटे उशीर झाल्याने उपचार मिळाले नाहीत.
२०२१ मध्येही अशा प्रकारची घटना घडली होती.
नागरिकांचा प्रशासनावर संताप, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.
कानपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेने पुन्हा एकदा मानवी जीवाचा बळी घेतला आहे. दाबौली परिसरातील रहिवासी बरखा गुप्ता यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे वेळेत रुग्णालयात पोहोचता आले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता, परंतु वाहतूक कोंडीमुळे त्यांना तातडीचा उपचार मिळू शकला नाही.
बरखा गुप्ता यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने पती सोनू गुप्ता यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीटीआय चौकापासून पुढे जाताच रस्ता ठप्प होता. मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम आणि फाजलगंज अग्निशमन दलाजवळ उभ्या असलेल्या ट्रकांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल २० मिनिटे सोनू गुप्ता आपल्या पत्नीला घेऊन गाडीतच अडकून पडले. यादरम्यान, बरखा यांना वेदना असह्य होत होत्या आणि सोनू मदतीसाठी आर्त हाका मारत होता, पण वाहतूक कोंडीमुळे कोणीही काही करू शकले नाही.
अखेर असहाय्यतेतून बरखा यांच्या नवऱ्याने धोकादायक मार्ग निवडला आणि नाल्यालगतून पर्यायी मार्गाने फजलगंज फॅक्टरी एरिया, मरियमपूर क्रॉसिंग व कोका कोला क्रॉसिंग मार्गे रुग्णालय गाठले. पण तोपर्यंत जवळपास ४५ मिनिटे उलटून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करून बरखा गुप्ता यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की जर वाहतूक कोंडी नसती तर त्यांचा जीव निश्चितपणे वाचला असता.
हे प्रकरण कानपूरसाठी नवे नाही. २०२१ मध्येही अशाच प्रकारे वाहतूक कोंडीमुळे वंदना मिश्रा नावाच्या महिलेला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. बरखा गुप्ता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की मेट्रो बांधकामाच्या चुकीच्या नियोजनामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडी तीव्र झाली आहे. मात्र, मेट्रो प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी पंचानन मिश्रा यांनी हा आरोप फेटाळून लावला असून, “सण-उत्सवांच्या गर्दीमुळे जाम होऊ शकतो, बांधकामाला कारणीभूत धरणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
मेट्रो बांधकाम, बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यावर उभे असलेले ट्रक आणि वाहतुकीवरील अपुऱ्या नियंत्रणामुळे कानपूर शहरातील नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतो. बरखा गुप्ता यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले आहे की, शहरातील वाहतूक कोंडी ही फक्त गैरसोयीची बाब नसून जीवघेणी ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याची मागणी केली असून, अन्यथा अशा आणखी घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.