उत्तर प्रदेशातील मथुरा येथे दिल्ली-आग्रा महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. छटीकरा पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून अन्य ३ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील क्रमांक असलेल्या कारमधून सात जण प्रवास करत होते. हे सर्वजण वृंदावन येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, छटीकरा पुलाजवळ पोहोचताच कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगण्यात येत आहे. तर उर्वरित जखमींवर सर्वोदय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींची तसेच जखमींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे दिल्ली-आग्रा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले की यामागे आणखी काही कारण होते, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.