तिरूपती बालाजीच्या लाडूत प्राण्यांची चरबी सापडल्यावरुन देशभरात खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानात आणि कोट्यवधींचं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडू शकतो यावरून संताप व्यक्त होतोय. आता केंद्र सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरल्याचा अहवाल समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयानं तपशीलवार माहिती आंध्र सरकारकडून मागवली आहे.
माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मात्र तेलगू देसम पार्टीचे आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिलंय.
दर सहा महिन्यांनी निविदा प्रक्रिया होते आणि पात्रता निकष अनेक दशकांपासून बदललेले नाहीत. पुरवठादारांनी एनएबीएल प्रमाणपत्र आणि उत्पादन गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे. देवस्थान नमुने गोळा करते. तूप आणि केवळ प्रमाणित उत्पादनेच वापरली जातात. आमच्या सरकारच्या काळात 18 वेळा उत्पादनांना नाकारलंय.
मात्र तिरूपतीतील बालाजीच्या लाडू प्रसादाच्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतर अहवालात काय नमूद करण्यात आलंय ते पाहूया.
गुजरातच्या लाईव्ह स्टॉक लॅबमध्ये सॅम्पल तपासले
लाडूसाठी बनवलेल्या तुपात प्राण्यांची चरबी
फिश ऑईल, बीफ फॅट, चरबीचे अंश
डुकराची चरबी असल्याचं अहवालात नमूद
9 जुलै 2024ला सॅम्पलची तपासणी केल्याची माहिती
16 जुलै 2024ला लाडूंबाबतचा अहवाल समोर
तिरुमला तिरुपती देवस्थानने लाडू बनवण्याचं काम स्वयंचलित करण्यासाठी 2023 मध्ये 50 कोटी रुपयांची मशीन घेतली.
तिरुपतीचे लाडू बनवण्याची 300 वर्षांपासूनची परंपरा आहे. लाडू खास पद्धतीने बनवले जातात, त्याला दित्तम म्हणतात. हा प्रसाद बनवण्यासाठी बेसन, काजू, बेदाणे, साखर, तूप, वेलची इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. आत्तापर्यंत या रेसिपीत फक्त 6 वेळा बदल करण्यात आले आहेत. प्रसाद तयार करण्यासाठी दररोज 10 टन बेसन, 10 टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो वेलची, 300 ते 400 लिटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो बेदाणे आदी घटकांचा वापर केला जातो. रोज जवळपास 8 लाख लाडू बनवले जातात.
वकील विनीत जिंदल यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि आंध्र प्रदेश पुलिस प्रमुखांकडे तक्रार करुन माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, तिरुमाला तिरुपती देवस्थानचे अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दक्षिणेच्या राजकारणात प्रसादाच्या लाडुमुळे कटूता आली आहे. कदाचित यापुढे प्रसादाची गुणवत्ता सुधारेलही मात्र श्रद्धेला गेलेले तडे कसे भरले जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.