राजा रघुवंशी हत्याकांड आणि प्रियकरासाठी त्याला संपवणाऱ्या सोनम रघुवंशीच्या प्रकरणानं अख्खा देश हादरला होता. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच आता पुन्हा तेलंगणात मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका दोन मुलांच्या आईनं प्रेमात अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीची निर्दयीपणे हत्या केली. सोशल मीडियावर व्हिडिओ बघून तिनं शांत डोक्यानं कट आखून पतीला संपवलं.
तेलंगणाच्या करीमनगरमध्ये ही घटना घडली. एका ग्रंथालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या संपथची त्याच्याच बायकोनं हत्या केली. त्याला दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या नशेत तो नेहमी बायकोला मारहाण करायचा. त्यांना दोन मुलं आहेत. त्या दोन्ही मुलांचं पालनपोषण रमादेवी करायची. एक छोटंसं स्नॅक्स कॉर्नर ती चालवायची. त्याच दुकानावर तिची ओळख ५० वर्षीय राजय्यासोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या दोघांच्या अनैतिक संबंधांत पती संपथ अडसर ठरत होता. त्यामुळं राजय्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीनं रमादेवीनं त्याची हत्या केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, वारंवार भांडणं आणि मारहाण करणाऱ्या संपथपासून रमादेवीला कायमची सुटका हवी होती. त्याला संपवण्याचं तिनं मनाशी पक्कं केलं होतं. तिनं सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बघितले. त्यावेळी एक व्हिडिओ तिच्या नजरेस पडला. त्यात खून करण्याचा प्लान सांगण्यात आला होता. रमादेवीनंही हा खतरनाक कट आपला प्रियकर राजय्याला सांगितला. त्यानंतर दोघांनी संपथच्या हत्येचा अगदी शांत डोक्यानं कट आखला.
रिपोर्ट्सनुसार, हत्येच्या रात्री राजय्या आणि त्याचा मित्र श्रीनिवासनं संपथला बॉम्माकल उड्डाणपुलाच्या नजीक दारू पिण्याच्या बहाण्यानं संपथला बोलावून घेतलं. संपथ खूप दारू प्यायला. त्याला चालताही येत नव्हतं. दारू प्यायल्यानंतर नशेत असलेला संपथ जमिनीवर पडला. राजय्याने त्याच्या कानात किटकनाशक टाकलं. यामुळं त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येनंतर राजय्याने रमादेवीला फोन करून कट यशस्वी झाल्याची माहिती दिली.
हत्येच्या दुसऱ्या दिवशी रमादेवीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्याला काहीच माहीत नाही असा बनाव करत संपथ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. १ ऑगस्टला संपथचा मृतदेह आढळून आला. पण शवविच्छेदन करू नये अशी विनंती रमादेवी आणि राजय्या या दोघांनी पोलिसांना केली. त्यावेळी पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. संपथच्या मुलानंही संशय व्यक्त केला होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
पोलिसांनी फोन कॉल डेटा, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. संशयावरून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. खाक्या दाखवल्यानंतर तिघांनीही कबुली दिली. रमादेवी, राजय्या आणि श्रीनिवास या तिघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.