कर्नाटकातील विजापूर येथील एसबीआय बँकेत ५८ किलो सोनं आणि ८ कोटी रुपयांचा रोकड दरोडा
लष्करी ड्रेस घालून आलेल्या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना धमकावले
सोलापूरमध्ये चोरट्यांची कार सापडली, मंगळवेढ्यातील घरातून २० किलो सोनं व रोकड मिळाली
दरोडेखोर फरार असून कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांचा संयुक्त तपास सुरू
कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील भारतीय स्टेट बँकेत (SBI) मंगळवारी सायंकाळी दरोडेखोरांनी दरोडा घातला. देशातील सर्वात मोठ्या बँकेवर चोरट्यांनी हात साफ करत तब्बल ५८ किलो सोनं आणि ८ कोटी रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर पोलीस यंत्रणांनी चोरांचा मागोवा घेत थेट सोलापूर गाठले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात पोलिसांना चोरांनी लंपास केलेले पैसे आणि सोनं सापडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडा घालण्यासाठी आलेल्या चोरांनी बँकेत लष्कराच्या ड्रेसमध्ये आणि तोंडावर मास्क घालून शिरकाव केला. हातात बंदुका आणि धारदार शस्त्रे घेऊन आलेल्या चोरट्यांनी बँकेतील कर्मचारी, मॅनेजर व कॅशियर यांना धमकावले. अलार्म वाजू नये म्हणून त्यांनी बँकेतील सर्व सुरक्षाव्यवस्था निष्क्रिय केली. त्यानंतर लॉकरमधील सोनं व रोकड पळवून नेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांना तपासादरम्यान चोरट्यांनी या दरोड्यासाठी वापरलेली कार महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये सापडली. या प्रकरणी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला असून दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली. दरम्यान, या दरोड्याशी संबंधित महत्त्वाचा धागा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती परिसरात पोलिसांना सापडला . येथे एका बंद घराच्या छतावर चोरट्यांनी दरोड्यातील सोनं आणि पैशांची बॅग टाकून दिली होती. या बॅगेत तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांची रोकड आणि २० किलो सोनं सापडले आहे.
दरम्यान पैसे आणि सोने हाती लागले असून दरोडेखोर अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेने बँकेतील आणि नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र चोरांनी हा दरोडा का टाकला ? या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर असून फरार चोरांचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.