deep depression Bay of Bengal latest weather update : कधी उघडीप तर कधी फक्त दहा ते पंधरा मिनिटांची जोरदार 'इनिंग' असा ऊन-पावसाचा खेळ सुरू असतानाच उद्या, गुरुवारसह पुढील आठवडाभर पावसाचं दमदार कमबॅक होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा (Deep Depression) तयार होऊन आंध्र प्रदेशचा उत्तर आणि दक्षिण ओडिशाच्या किनारी प्रदेश पार केल्यानंतर उद्या, २४ सप्टेंबरला देशाच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जवळपास १९ राज्यांत हलक्या सरी ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम बंगाल उपसागराच्या उत्तरेला तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, २३ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत विशाखापट्टणम आणि गोपालपूर दरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाची किनारपट्टी ओलाडू शकतो. परिणामी, २३ आणि २४ सप्टेंबरला आंध्र प्रदेशचा किनारी पट्टा, ओडिशाचा दक्षिण भाग, छत्तीसगडचा दक्षिण परिसर, तसेच २४ आणि २५ सप्टेंबरला तेलंगणामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबरला तेलंगणा, दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीम आदी राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, राजस्थानचा पूर्वेकडील प्रदेश, आसाम, मेघालय आणि कर्नाटकाच्या किनारी भागात २४ सप्टेंबरला मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच ६० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने २५ आणि २६ सप्टेंबरला पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. यामुळे प्रदेशातील कमाल तापमानात ६ ते ९ अंश सेल्सिअसची मोठी घसरण होऊ शकते. IMD नुसार, २४ ते २९ सप्टेंबर या काळात मध्य प्रदेशचा पश्चिम भाग; २४ आणि २९ सप्टेंबरला मध्य प्रदेशचा पूर्व परिसर; तर २९ सप्टेंबरला विदर्भात काही ठिकाणी किंवा हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या काळात पश्चिम-मध्य आणि बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडे आणि आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर २४ सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे मच्छिमारांनी २४ सप्टेंबरपर्यंत बंगालचा उपसागर आणि संबंधित किनारपट्टीच्या भागात न जाण्याचा इशारा दिलाय.
हवामान विभागानुसार, २४ सप्टेंबरच्या सकाळी ११:३० वाजेपर्यंत ओडिशातील पुरी, कटक, खोर्धा, गंजम, कोरपुट, जगतसिंगपूर आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसानंतर अचानक पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागातील श्रीकाकुलम, विशाखापट्टणम, विजयनगरम, गुंटूर, कृष्णा आदी जिल्हे, तसेच छत्तीसगड आणि तेलंगणातील दंतेवाडा, नारायणपूर, खम्मम, भद्राद्री कोठगुडेम आणि मुलुगु जिल्ह्यांतील सखल भाग व पाणलोट क्षेत्रांमध्ये पुराचा धोका उद्भवू शकतो, असे सांगण्यात आले आहे.
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात २४ सप्टेंबरला आकाश निरभ्र राहील. या काळात कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस ते ३५ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आग्नेय दिशेने ताशी २५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत मान्सून पंजाब, हरियाणा, राजस्थानचा बहुतांश भाग, संपूर्ण दिल्ली आणि उत्तर प्रदेश, गुजरातच्या काही भागांतून परतला आहे, अशी माहितीही आयएमडीकडून देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.