दिल्ली - काँग्रेस देशभरात महागाई आणि बेरोजगारीविरोधात रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेस राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या दिल्लीतील निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. याअगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टिका केली.
देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आज देशात चार लोकांची हुकूमशाही सुरु केली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
'आम्हाला महागाई, बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा आहे. आम्हाला याबद्दल चर्चा करायची आहे. आम्हाला बोलू दिले जात नाही. संसदेत चर्चा होत नाही. आम्हाला अटक केली जाते. ही आज भारताची स्थिती आहे, असही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.
हे देखील पाहा -
देशाची न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांच्या बळावर विरोधी पक्ष उभा आहे. आज या सर्व संस्था सरकारला साथ देत आहेत. सरकारने आपल्या लोकांना येथे बसवून ठेवले आहे. भारतातील प्रत्येक संस्था आज स्वतंत्र नाही. आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाही, आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केली.
अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही
अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हे कळत नाही. एक वास्तविकता आणि दुसरी धारणा. ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे हा स्टार्टअप इंडिया. ते लोकांना बाहेर काढत आहेत. या लोकांचे म्हणणे आहे की कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. पण संयुक्त राष्ट्र म्हणत आहे कोरोनाने मृत्यू झाले आहेत, असही राहुल गांधी म्हणाले.
मी जे काही बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरतो. या लोकांना भारताच्या स्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते. हे लोक 24 तास खोटे बोलण्याचे काम करतात असही राहुल गांधी म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.