भारतासह आता पाकस्तानची हवा सुद्धा विषारी झाली आहे. प्रदूषित हवेमुळं तेथील लाखो नागरिकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं असतानाच, आता तेथील पंजाब सरकारने दोन शहरांमध्ये पूर्णपणे लॉकडाउन लागू केला आहे. पंजाब प्रांत सरकारनं लाहोर आणि मुल्तानमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे.
लाहोर आणि मुल्तानमध्ये शुक्रवारपासून रविवारपर्यंत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी होणार आहे. या दोन्ही शहरांमधील हवेच्या प्रदूषणाची पातळी अत्यंत खालावलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पंजाबच्या अनेक शहारांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. लाहोर आणि मुल्तानमध्ये वायू प्रदूषणाची पातळी घसरली आहे. मुल्तानमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २००० च्या पलीकडे पोहोचला आहे.
पंजाबचे मंत्री मरियम औरंगजेब यांनी शुक्रवारी यासंदर्भात तात्काळ पत्रकार परिषद घेतली. आम्ही लाहोर आणि मुल्तानमध्ये आरोग्य आणीबाणीची घोषणा करत आहोत. दोन्ही शहरांमध्ये शुक्रवारपासून रविवारपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लाहोर आणि मुल्तानमधील निर्माणाधीन बांधकामे पुढील १० दिवस पूर्णपणे थांबवण्यात आली आहेत. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरांमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
गंभीर वायू प्रदूषणामुळं येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. तर कॉलेज आणि विद्यापीठांमधील वर्ग ऑनलाइन सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेस्तराँ, हॉटेल्स संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच खुले असणार आहेत. तर रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू राहील. मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, या मोसमात लग्नसोहळ्यांच्या आयोजनावर कुठलेही बंधन नसणार आहे.
मरियम औरंगजेब म्हणाले की, लाहोरमध्ये केवळ तीन टक्केच झाडे आहेत. उलट या ठिकाणी ३६ टक्के झाडे असली पाहिजेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने शहरात वृक्षारोपण मोहीम राबवण्याची योजना आखली आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांनी पराली जाळण्याच्या ऐवजी ती नष्ट करण्यासाठी १००० सुपर सीडर्स दिले आहेत. ८०० विटभट्ट्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.