नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुरुद्वारातून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत कापणी न केल्यास गेट पूर्णपणे बंद केले जातील, असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत आपल्या पिकांची कापणी पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. BSFच्या आदेशानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे.
पंजाबमधील पठाणकोट ते फाजिल्कापर्यंत ५५३ किलोमीटर लांबीच्या सीमेवर सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. BSF जवानांनी बॉर्डर आणि गावांमधील गस्त वाढवली आहे. गावांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास, तात्काळ पोलीस आणि BSF जवानांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. बॉर्डरवर कोणतीही हालचाल दिसल्यास, थेट गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फिरोजपूरमधील कालूवाला हे गाव सतलुज नदीने तीन बाजूंनी वेढलेलं आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, भारत-पाकिस्तान तणावामुळे या गावाला नेहमी सर्वात आधी खाली केलं जातं. त्यामुळे येथील नागरिक भयभीत आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन तारेच्या कुंपणाच्या पलीकडे आहे, त्यांना लवकर कापणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पंजाबमधील सीमेवरील गावे लवकरच खाली केली जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.