म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देश शुक्रवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे म्यानमारच्या सागाईंग प्रदेशापासून थायलंडची राजधानी बँकॉकपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या आणखी एका भूकंपाने म्यानमार पुन्हा हादरले. सध्या दोन्ही देशातील परिस्थिती गंभीर असून या भूकंपामध्ये आतापर्यंत १५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ७०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे म्यानमारमधील रस्त्यांना मोठ-मोठ्या भेगा पडल्यात. या भूकंपाचे हादरवून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत. (Myanmar-Thailand Earthquake Marathi News)
म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के शेजारील देश थायलंडमध्येही जाणवले. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली उंच इमारत कोसळून किमान १० जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले आणि १०१ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे म्यानमार आणि थायलंडमधील परिस्थिती खूपच भयानक झाली आहे. बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. म्यानमारमध्ये सगळीकडे कोसळलेल्या इमारती, पूल, रस्त्यांना पडलेल्या भेगा दिसत आहेत. (Myanmar Earthquake Latest Marathi News)
एकट्या म्यानमारमध्ये भूकंपामुळे झालेल्या मृतांचा आकडा १५० च्या वर गेला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आहे. म्यानमारमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यात आहे. जखमींची संख्या देखील वाढत चालली आहे. रुग्णालयांमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जखमी नागरिकांचा जीव वाचवणे आणखी कठीण झाले आहे. म्यानमार लष्कराने ६ राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
म्यानमारमधील मंडाले शहरातील इरावती नदीवरील ऐतिहासिक अवा पूल कोसळला. राजधानी नायपिडॉ येथील रस्त्यांना भेगा पडल्या आणि अनेक इमारती कोसळल्या. मशीद कोसळून २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मंडालेमधील मंदिरे आणि बुद्ध विहार कोसळल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
म्यानमार सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागात रक्तदानाची मोठी गरज आहे. संयुक्त राष्ट्रांनी तात्काळ मदत कार्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली. दोन्ही देशांमधील रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या सतत वाढत आहे. म्यानमारमध्ये ७३२ हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली. तर थायलंडमध्येही १०० पेक्षा अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात डॉक्टरांना अडचणी येत आहेत. स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत परंतु पुरवठा अजूनही गरजेपेक्षा कमी आहे.
भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलेल्या म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशांच्या मदतीसाठी भारत धावला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान मदत साहित्य आणि वैद्यकीय पथकासह सज्ज आहे. पीएम मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, 'म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मी चिंतेत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. भारत सर्वत्तोपरी मदत करण्यास तयार आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.