सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका लग्नाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्न ठरल्यानंतर मुलाकडच्यांनी हुंड्यात कारची मागणी केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मागणीला अनोख्या पद्धतीने उत्तर देत मुलीच्या कुटुंबीयांनी चक्क खेळण्यातील प्लास्टीकची कार मुलाच्या वडिलांच्या हातात दिली. तुम्हाला माणूस नको, कार हवी होती. आम्ही तुम्हाला स्कॉर्पिओ दिली आहे, आता ती चालवा, असा टोला त्यांनी लगावला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी साखरपुडा परत करत लग्न मोडल्याचे जाहीर केले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मेरठमधील भावनपूरमध्ये एका गावातील तरुणाचे लग्न परतापूरच्या एका तरुणीशी पाच महिन्यांपूर्वी ठरले होते, दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने साखरपुडाही झाला होता. त्यावेळी मुलीकडच्यांनी रोख रक्कम आणि इतर काही वस्तू दिल्या होत्या. सुरुवातील सर्व काही सुरळीत सुरू होते.
मात्र 29 नोव्हेंबर रोजी मुलीच्या घरी लग्नातील लाल खत हा विधी पार पडणार होता. यासाठी मुलाकडील मंडळी सकाळीच मुलीच्या घरी पोहोचली होती. मात्र बराच वेळ होऊनही ही विधी पडली नाही. सकाळची संध्याकाळ झाली मात्र तरी देखील विधीला सुरुवात झाली नव्हती. मुलीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबाची जमीन विकली गेली होती. याची माहिती मुलाकडच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी हुंड्यात कारची मागणी केली. मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाकडचे आपल्या मागणीवर ठाम होते.
अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाकडच्यांना धडा शिकवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. बाजारातून लहान मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिकची कार मागवण्यात आली. त्यानंतर ही कार मुलाच्या वडिलांच्या हातात देण्यात आली. यावेळी मुलीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने, 'तुम्हाला माणूस नको होता, तुम्हाला कार हवी होती. आम्ही तुम्हाला स्कॉर्पिओ दिली आहे, आता ती चालवा,' असा उपरोधिक टोला लगावला. तसेच, साखरपुडा परत करण्यात आला असून लग्न रद्द केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हुंड्याच्या मागणीला मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेलं हे अनोखं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.