Serbia News SAAM TV
देश विदेश

Serbia News: सर्बियात मोठा राजकीय उलटफेर! पुतिन समर्थक वुसिक यांना धक्का, स्टूडेंट लिस्टला पूर्ण बहुमत

Serbia parliamentary election 2026: सर्बियाच्या संसदीय निवडणुकीत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील स्टुडंट लिस्टने मोठी आघाडी घेतली आहे. अलेक्झांडर वुसिच यांनी पराभव मान्य केला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, निवडणुकीचे प्राथमिक आकडे आणि सर्बियाच्या राजकारणातील या बदलाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

सर्बियाच्या राजकारणात मोठा बदल झालाय. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच यांच्या पक्षाला संसदीय निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीच्या निकालांनुसार, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील 'स्टुडंट लिस्ट' या गटाने संसदेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे आता या गटाला नवं सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे.

वुसिच यांनी स्वीकारला पराभव

सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिच यांची पार्टी गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत होती. मात्र यंदाच्या संसदीय निवडणुकीत त्यांना आपली सत्ता टिकवता आलेली नाही. निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालांनंतर देशाला संबोधित करताना वुसिच यांनी आपल्या पक्षाचा पराभव झाल्याचं मान्य केलं.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून विरोधी गटाला स्पष्ट आघाडी मिळाल्याचं दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. 'स्टुडंट लिस्ट' हा गट पुढील सरकार सहज स्थापन करू शकेल, असंही त्यांनी म्हटलं.

वुसिच यांच्या 'सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी'ला (SNS) पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यात अपयश आलं आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, 'स्टुडंट लिस्ट'ला संसदेत १३५ ते १४० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वुसिच यांच्या पक्षाला जवळपास १०५ जागांवर समाधान मानावं लागू शकतं.

इतर पक्षांना किती जागा मिळाल्या?

सर्बियाच्या संसदेत प्रामुख्याने दोन मोठे राजकीय गट आणि काही अल्पसंख्याक पक्षांचे प्रतिनिधी असतील, असं वुसिच यांनी सांगितलं. त्यांच्या माहितीनुसार, 'अलायन्स ऑफ वोज्वोडिना हंगेरियन' या पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत. अल्बेनियन समाजाच्या प्रतिनिधींना एक जागा मिळाली आहे. तसेच, SDA या पक्षालाही एक जागा मिळाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

'स्टुडंट लिस्ट'ला ५२ टक्के मतं

युरो न्यूजच्या वृत्तानुसार, मतमोजणीच्या आकडेवारीत 'स्टुडंट लिस्ट'ला सुमारे २२ लाख मतं मिळाली आहेत. एकूण मतदानापैकी ही जवळपास ५२ टक्के मतं आहेत. दुसरीकडे सत्ताधारी 'सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी'ला सुमारे १७ लाख २० हजार मतं मिळाली आहेत. एकूण मतदानाच्या तुलनेत हा वाटा ३२.३ टक्के आहे.

मतांच्या टक्केवारीत मोठी आघाडी मिळाल्यामुळे 'स्टुडंट लिस्ट'ने निवडणुकीत निर्णायक विजय मिळवला. सुरुवातीच्या अंदाजानुसार, या गटाला १३५ ते १४० जागा मिळू शकतात. तर सत्ताधारी पक्षाच्या जागांची संख्या जवळपास १०५ पर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून उभा राहिला विद्यार्थ्यांचा गट

सर्बियात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन सुरू होतं. १ नोव्हेंबर २०२४ रोजी नोवी साद रेल्वे स्थानकावरील छताचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बांधकामातील कथित भ्रष्टाचार आणि सरकारी यंत्रणेतील गैरव्यवहाराविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढला. या घटनेचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. हळूहळू या आंदोलनाला मोठं स्वरूप मिळालं.

सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करतानाच, लोकशाही संस्था कमकुवत केल्याचाही आरोप या गटाकडून करण्यात आला. या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत गेला. अखेर जानेवारी २०२५ मध्ये तत्कालीन पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता संसदीय निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही

या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी वेगळा मार्ग निवडला. स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी त्यांनी डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ आणि कलाकार यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना उमेदवारी दिली. संसदेच्या सर्व २५० जागांसाठी 'स्टुडंट लिस्ट'च्या माध्यमातून उमेदवार उभे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या जनसमर्थनाचा फायदा या गटाला निवडणुकीत झाल्याचं दिसत आहे. दीर्घकाळ सत्तेत असलेल्या पक्षाला पराभूत करत या गटाने सर्बियाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे.

युरोपियन युनियनकडून विजयाचं स्वागत

सर्बियाच्या निवडणुकीच्या निकालानंतर युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डर लेयेन यांनी 'स्टुडंट लिस्ट'चं अभिनंदन केलं. सर्बियाचं भविष्य युरोपियन युनियनमध्ये पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्यास आपण पूर्णपणे तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. या निकालामुळे सर्बियाच्या राजकारणात नवं पर्व सुरू होण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचाराविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता निवडणुकीतही मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे नव्या सरकारकडून देशातील कारभारात कोणते बदल केले जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवासी ट्रॅकवर उतरले

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीला अखेर अटक, भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीला धमकावलं अन्...

Anarase Recipe: दिवाळीच्या फराळात बनवा खुसखुशीत आणि गोड अनारसे, वाचा ही सोपी स्पेशल रेसिपी

Tea Benefits For Heart Health: रोज 1 कप चहामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका? नवीन अभ्यासात समोर आली आश्चर्यकारक माहिती

PM Kisan Yojana : खुशखबर! पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार, या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात

SCROLL FOR NEXT