महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पडलेली उभी फूट अवघ्या देशाने पाहिली. त्यात प्रादेशिक पक्षातील फुटीच्या या महाराष्ट्र पॅटर्नची पुन्हा देशात चर्चा सुरु झालीय... आणि त्याला कारण ठरलयं... पश्चिम बंगालमध्ये झालेलं सत्तांतर... विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर तृणमूलच्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सर्वात मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झालीय. तृणमूलचे तब्बल 50 आमदार बंडखोरीच्या तयारीत असून, बंगालमध्ये हुबेहूब 'महाराष्ट्र मॉडेल' सक्रिय झाल्याचा दावा खुद्द टीएमसीच्याच निलंबित नेत्यानं केलाय...
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर टीएमसीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. सध्या बंगालमध्ये विरोधी पक्षनेते आणि चीफ व्हिप यांच्या नियुक्तीच्या पत्रांवरून 'स्वाक्षरी घोटाळा' गाजतोय. आमदार संदिपन साहा आणि ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप केलाय. त्या या आरोपानंतर ममता बॅनर्जी यांनी तातडीने या दोन्ही आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र, या कारवाईमुळे पक्षात उभी फूट पडली असून, ऋतब्रता बॅनर्जी आणि संदिपन साहा यांच्या नेतृत्वाखाली 'नवीन तृणमूल काँग्रेस' स्थापन होणार असल्याचं दत्ता यांनी सांगितलयं...
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न कसा राबवला जाणार आहे पाहूयात...
२९४ सदस्यांच्या बंगाल विधानसभेत नुकत्याच झालेल्या पराभवानंतर टीएमसीचे संख्याबळ ८० वर आले. त्यात दोन आमदारांच्या हकालपट्टीनंतर संख्याबळ 78 वर पोहचलयं... तर ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला 80 पैकी तब्बल 60 आमदारांनी दांडी मारली. फक्त 20 आमदार या बैठकीला उपस्थित होते. दुसरीकडे पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आमदार येऊ शकले नाहीत, असा बचावात्मक पवित्रा पक्षानं घेतला असला तरी तृणमूलमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे... अशातच 60 आमदारांची बैठकीला दांडी ही 50 आमदारांच्या बंडाची नांदी ठरण्याची शक्यता आहे...जर 50 आमदारांनी बंडखोरी केली तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार नाही. उलट, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार 'जोडा फूल' हे चिन्ह आणि 'तृणमूल काँग्रेस' हे नावही या बंडखोर गटाला मिळू शकते.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत दोन-तृतीयांश बहुमताच्या जोरावर मूळ पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. ज्य़ामुळे पक्षावरील अधिकाराचा वाद अद्याप कोर्टात सुरु आहे... अशातच आता 'खेला होबे'चा नारा देऊन विरोधकांना पाणी पाजणाऱ्या ममता बॅनर्जी स्वतःच्याच घरात लागलेली ही आग विझवू शकणार का? की महाराष्ट्राप्रमाणेच बंगालमध्येही 'दीदीं'ना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवावे लागणार? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.