Seven killed in Khunti truck accident : झारखंडमधील खूंटी जिल्ह्यात एक अतिशय भीषण दुर्घटना घडली आहे. स्कुटीच्या एका छोट्या अपघातानंतर मदतीसाठी रस्त्यावर जमा झालेल्या लोकांना एका भरधाव ट्रकने चिरडले. या भयानक अपघातात ४ महिला आणि ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Khunti road accident near Jon Ludru turn)
खुंटीच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने स्कूटरस्वाराला चिरडल्याने झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. सर्वजण अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी धावले होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने त्या जमावाला चिरडले. क्षणात त्या ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. परिसरात जिकडे तिकडे आक्रोश अन् संताप होता.
गुरुवारी रात्री उशिरा भरधाव वेगाने असणाऱ्या १८ चाकी ट्रकने धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाला. ही घटना कर्रा-टोरपा मुख्य रस्त्यावर जॉन-लुद्रू वळणाजवळ घडली. मृतांमध्ये चार महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. मृतांमध्ये पको देवी, कसिला देवी, मनहू देवी, गोलू कुमार, अंजली कुमारी, तुती कुमारी आणि १२ वर्षीय सौरभ नायक यांचा समावेश आहे. खुशबू कुमारी या जखमी झाल्या असून तिच्यावर खुंटी सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व मृत हे झोन-लुद्रू वळणाजवळ असलेल्या एका वस्तीतील रहिवासी होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी रात्री ९:४५ वाजता झोन-लुद्रू वळणाजवळ एका स्कूटरस्वाराचा तोल गेला आणि तो पुलाजवळच्या झुडपात पडला. घटनेची माहिती मिळताच, स्कूटरस्वाराला मदत करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि मुले पुलाजवळ जमा झाली. त्याच वेळी तोरपाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारावेळी मृत्यू झाला.
अपघातामुळे सर्वत्र भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी झारखंड पोलिसांना सतर्क केले आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतांचे मृतदेह आणि जखमींना खुंटी सदर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारावेळी १२ वर्षीय सौरभ नायकचाही मृत्यू झाला. खुशबू कुमारीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचा (JH 02 AJ 1377) चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.