इंडिया आघाडीचा विराट मोर्चा संसद भवनातून निर्वाचन सदनापर्यंत निघणार.
राहुल गांधी मोर्चाचे नेतृत्व करतील, ३०० खासदारांचा सहभाग अपेक्षित.
महाराष्ट्र व हरियाणा निकालांवरील मतचोरीच्या आरोपांवर उत्तरांची मागणी.
काँग्रेसकडून मतचोरीविरोधी संकेतस्थळ व तक्रार मोहिम सुरू.
मतचोरीप्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीनं एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर आज सकाळी ११ वाजता इंडिया आघाडीतील नेत्यांचा विराट मोर्चा निघणार असून, या मोर्चाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी होणार असून, सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून केलेल्या कथित संघटित मतचोरीचा जाब आयोगाकडे मागण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील निकाल लागताच 'दाल में कुछ तो काला है' अशी प्रतिक्रिया देशभरातून आली होती. सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मतांची अफरातफर केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. मतचोरीचा आरोप करत इंडिया आघाडीने बैठक घेत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
इंडिया आघाडीचा हा विराट मोर्चा संसद भवन ते निर्वाचन सदनपर्यंत निघेल. या मोर्चादरम्यान, मतांची चोरी कशी झाली? मतांची चोरी का आणि कशी होऊ दिली? यात नेमका कुणाचा सहभाग होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं यावेळी निवडणूक आयोगाकडे मागण्यात येणार आहे.
या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे खासदार सहभागी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी खास खासदारांसाठी सोमवारी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनावेळी पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या या मोर्चातडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
संकेतस्थळावर मतचोरीची तक्रार नोंदवा
निवडणूक प्रक्रियातील घोटाळ्याविरोधात राहुल गांधी यांनी वेबसाईट सुरू केली आहे. मतदारयादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेसकडून देशव्यापी मोहिमेची सुरूवात करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून राहुल गांधींनी या वेबसाईटची सुरूवात केली. व्होटचोरी डॉट इन या संकेतस्थळावर लोकांना तक्रार नोंदवता येईल. किंवा ९६५०००३४२० या नंबरवर मिस्ड कॉल देऊन करता येईल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
निवडणूक आयोग खासदारांना भेटणार
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र पाठवलं आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी १२ वाजता खासदारांना भेटीसाठी वेळ दिली आहे. फक्त ३० व्यक्तींना भेटीची परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.