हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 ने (Hurun Rich List 2024) देशातील अब्जाधीशांची यादी आज जाहीर केली. या यादीनुसार अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.
हुरुन इंडिया रिचच्या या यादीत २१ वर्षीय तरुणानेही आपले स्थान निर्माण केले आहे. झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3,600 कोटी रुपये इतकी आहे. २१ वर्षीय कैवल्य वोहरा (Kaivalya Vohra) यांनी २०२१ मध्ये झेप्टोची स्थापना केली. झेप्टो कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक आदित पालिचा हे भारतातील दुसरे सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत. आदित पालिचा यांचे वय अवघे २२ वर्षे आहे.
कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा या दोघांनही स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. पण त्यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कम्प्युटर सायन्सचा कोर्स अधर्वट सोडला. यानंतर देशात कोरोना महामारीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या डिलिव्हरीची वाढती मागणी लक्षात घेऊन २०२१ मध्ये त्यांनी झेप्टो या क्विक डिलिव्हरी अॅपची स्थापन केली. Amazon, Swiggy Instamart, Blinkit आणि Tata Group च्या BigBasket सारख्या अनेक कंपन्या या क्षेत्रात आधीपासूनच होत्या. त्यांना देखील झेप्टोने टक्कर दिली.
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, गेल्या वर्षी भारतात दर पाच दिवसांनी एक नवीन व्यक्ती अब्जाधीश बनत आहे. हुरुन इंडियाचे संस्थापक आणि चीफ रिसर्चर अनास रहमान जुनैद यांनी सांगितले की, भारताने वेल्थ क्रिएशनच्या बाबतीत जगाील अनेक देशांना मागे टाकत ट्रिपल सेंच्युरी मारली. २०२३ मध्ये भारतात एकूण ७५ नवीन अब्जाधीशांची भर पडली. ३८६ अब्जाधीशांसह हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे एकूण २१७ अब्जाधीश राहतात. या यादीत हैदराबादचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी १०४ अब्जाधीश राहतात.