दिल्लीत शूज कारखान्याला शुक्रवारी रात्री भीषण आग
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल २० गाड्या घटनास्थळी
या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार जखमी
राजधानी दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक परिसरात शुक्रवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. येथील एका शूज बनवणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक कामगार जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कारखाना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कारखान्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या तब्बल २० गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनीही त्वरित धाव घेत बचावकार्य सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या तळमजल्याखालील बेसमेंटमध्ये आग लागली होती. अग्निशमन जवानांनी आग बेसमेंटमध्येच आटोक्यात आणली. मात्र, धूर इमारतीच्या वरच्या चार मजल्यांपर्यंत पसरला. त्यामुळे इमारतीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढताना बचाव पथकासमोर मोठे आव्हान उभे राहिले.
विशेषतः तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, सहा जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या जखमींना तातडीने संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेबाबत डीसीपी विक्रम सिंह यांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारखाना मालकाला घटनास्थळी बोलावण्यात आले असून, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात नेमके किती कामगार उपस्थित होते, याचीही माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर पोलिस आणि बचाव पथकाकडून इमारतीत शोधमोहीम राबवण्यात येत आहे. आतमध्ये आणखी कोणी अडकले आहे का, याची तपासणी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.