Shreya Maskar
हिवाळ्यात थंड वारे, वातावरणातील कमी आर्द्रता आणि हीटरचा वापर यामुळे डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी डोळ्यांमध्ये जळजळ, खाज, लालसरपणा आणि काही वेळा अंधुक दिसण्याची समस्या जाणवू शकते.
हिवाळ्यात वाहणारे थंड वारे डोळ्यांच्या पृष्ठभागावरील अश्रूंचा थर लवकर कोरडा करू शकतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये ओढल्यासारखे वाटणे, जळजळ होणे आणि खाज येणे अशा समस्या निर्माण होतात. बाहेर जाताना चष्मा, गॉगल वापरल्यास थेट वाऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते.
हिवाळ्यात वातावरणातील आर्द्रता कमी होते. त्यामुळे डोळ्यांमधील अश्रू लवकर वाळतात. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो.
थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण घरात हीटर किंवा ब्लोअरचा वापर करतात. मात्र, या उपकरणांमधून येणारी उष्ण आणि कोरडी हवा डोळ्यांमधील ओलावा कमी करू शकते. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा आणि खाज जाणवू शकते.
हिवाळ्यात घरात जास्त वेळ घालवल्यामुळे मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपचा वापर वाढतो. स्क्रीनकडे सतत पाहताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. त्यामुळे अश्रूंचा थर व्यवस्थित पसरत नाही आणि डोळे कोरडे पडू शकतात.
थंडीमध्ये अनेकांना तहान कमी लागते. त्यामुळे काहीजण पुरेसे पाणी पीत नाहीत. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डोळ्यांच्या ओलाव्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यात धूळ, धूर आणि घरातील इतर सूक्ष्म कणांमुळे काही व्यक्तींना डोळ्यांची ॲलर्जी होऊ शकते. यामुळे डोळ्यांना खाज येणे, पाणी येणे, लालसरपणा आणि जळजळ होण्याचा त्रास जाणवतो. अशावेळी डोळे वारंवार चोळणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.