नवी दिल्ली : येत्या १७ ऑक्टोबरला कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुक (Congress President Election) होणार आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचच लक्षं लागलं आहे. अशात कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आपली मतं मांडली आहेत. कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच पक्षाचे अध्यक्ष व्हावेत असा आग्रह केला आहे. मात्र, अनेक नेत्यांचा राहुल गांधींच्या नावाला विरोधही आहे. काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली होती, यावेळी त्यांनी सोनिया गांधींना दिलेल्या पत्रात राहुल गांधीवर निशाणादेखील साधला होता. त्यामुळे अशा वातावरणात कॉंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. (Congress President Election News)
हे देखील पाहा -
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पक्षाच्या प्रमुख्यस्थानी कोण विराजमान होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास तयार नसल्यास, तर पक्षातील कोणत्या नेत्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. सोनिया गांधी या पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार की गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होणार या दृष्टीने देखील विचार केला जात आहे. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागेल, त्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. दरम्यान कॉंग्रेस कार्यसमितीच्या ऑनलाईन बैठकीत कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आपली पहिली पसंत कोण हे सोनिया गांधींना सांगितले आहे.
कॉंग्रेस कार्यसमितीच्या ऑनलाईन बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश रावत म्हणाले की, राहुलजी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होतील. आम्हा सर्वांना आशा आहे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करतो. ऑनलाइन CWC बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सध्या ते आरोग्य तपासणीसाठी परदेशात आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा हे देखील सोनिया गांधी यांच्यासोबत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही रविवारी सांगितले की, पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच ‘पहिले’ आणि ‘एकमेव’ पर्याय आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. परदेशातून आल्यानंतर अध्यक्षपदासाठी राहुल गांधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही खुर्शीद म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ही निवडणूक १७ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याचे निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील, असे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी CWC बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान न झाल्यास, पक्षातील अन्य नेत्यांच्या गळ्यात अध्यदपदाची माळ देखील पडू शकते. त्या अनुषंगाने देखील चर्चा सुरू आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष न झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत देखील पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती काँग्रेसशी संबंध असलेल्या सूत्रांनी दिली आहे. तसेच गहलोत यांच्या व्यतिरिक्त पक्षातील मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, कुमारी शैलजा आणि अन्य काही नावांचा देखील विचार करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.