काँग्रेस व्होटबँकेचं व्हायरस पसरवत असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर, त्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खरगे यांनी भाजपसहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. हे बाबासाहेबांचे शत्रू आहेत, असं खरगे म्हणाले.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अवमान आणि वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध करणारा काँग्रेस पक्ष व्होटबँकेचं व्हायरस पसरवत आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणाच्या एका सभेत केला. त्यावर खरगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 'हे लोक डॉ. बाबासाहेबांचे तेव्हाही शत्रू होते आणि आजही आहेत. बाबासाहेब जिवंत असतानाही त्यांनी बाबासाहेबांना कधीच पाठिंबा दिला नाही. जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा हेच लोक काय म्हणाले ठाऊक आहे का? बाबासाहेब महार समाजाचे आहेत. अस्पृश्य आहेत आणि आता बुद्धांनाही अस्पृ्श्य केले', असं खरगे म्हणाले. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष होता, तेव्हा हिंदू महासभा त्यांच्या विरोधात उभी राहिली होती', असेही खरगे म्हणाले.
यावेळी त्यांनी महिला आरक्षणाचाही मुद्दा उपस्थित केला. 'जेव्हा २ वर्षांपूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले, तेव्हा काँग्रेस पक्षाने ते त्वरित लागू करण्याची मागणी केली होती. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांना आरक्षण देण्यात यावे, हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही बराच काळ यासाठी लढा देत राहिलो. ते पुढे नेण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय अहमदाबाद अधिवेशनात घेण्यात आला होता, असंही खरगेंनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
तत्पूर्वी हरयाणातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. 'काँग्रेस संविधान संपुष्टात आणत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात समानता आणू इच्छित होते. परंतु, काँग्रेसने 'व्होटबँक पॉलिटिक्सचा व्हायरस' पसरवला. बाबासाहेबांना वाटत होतं की, प्रत्येक गरीब, प्रत्येक मागासवर्गीय व्यक्ती सन्मानाने जगू शकेल, स्वप्ने पाहू शकेल आणि ती पूर्ण करू शकेल अशी इच्छा त्यांची होती', असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली. मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.