नवी दिल्ली : चीनच्या झुहाई शहरात हिट अँड रन अपघाताची भीषण घटना घडली आहे. एका ६२ वर्षीय व्यक्तीने एका स्पोर्ट्स सेंटरबाहेर व्यायाम करणाऱ्या लोकांना चिरडल्याचा भयंकर प्रकार केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीने घटस्फोटाच्या नैराश्यातून हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातातील आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने केलेलं कृत्य हेतूपूर्वक केल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, आज मंगळवारी चिनी सैन्य दलाने झुहाई शहरात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या एक दिवसाआधी ही भयंकर अपघाताची घटना घडली आहे. या भीषण घटनेतील आरोपीची ओळख झाली आहे. झुहाईच्या शांग चोंग रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, या घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या जखमींवर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.
रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक जखमी लोक जमीन झोपल्याचे दिसत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये २० जण रस्त्यावर झोपल्याचे दिसत आहे. या घटनेतील जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी ते जोरजोराने 'दहशतवादी' ओरडत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपीचं आडनाव फान असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी फानने घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं. त्याने धारदार शस्त्राने स्वत:ला जखमी केलं. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी फान पत्नीशी घटस्फोट झाल्यामुळे नाराज होता. त्यामुळे फानने भयंकर कृत्य केल्याचं बोललं जात आहे.
चीनमधील भयंकर घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जखमींना सहाय्य करण्यास सांगितलं आहे. त्यांनी आरोपीला कडक शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चिनी सरकारकडून एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.