बिहारच्या बक्सर जिल्ह्यात बुधवारी (११ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भयानक अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ७० प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, या अपघाताबाबत लोको पायलटने एक खळबळजनक खुलासा केला आहे. (Latest Marathi News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन रुळावरून घसरण्यापूर्वी (Train Accident) लोको पायलटला एक मोठा आवाज आला. त्यामुळे लोको पायलटने अचानक ब्रेक दाबले. मात्र, काही कळण्याच्या आतच ट्रेनचे २१ डबे रुळावरुन घसरले. गेटमनने देखील या आवाजाची पुष्टी केली आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात? असा संशय व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे ट्रेनचे गार्ड विजय कुमार यांनी देखील थरकाप उडवणाऱ्या या घटनेबाबत माहिती सांगितली. विजय म्हणाले, ट्रेन सामान्य वेगाने धावत होती. मी बसून माझे काही पेपरवर्क करत होतो. तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. लोको पायलटने ब्रेक लावताच ट्रेन रुळावरुन घसरली. त्यानंतर मोठा धक्का बसला. मी त्याच क्षणी बेशुद्ध झालो, असं विजय सांनी सांगितलं आहे.
पाच मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर मी डोळ्यांवर पाणी शिंपडले. अपघाताच्या आधी झालेला आवाज कशाचा होता? लोको पायलटने अचानक ब्रेक का मारला ते कळलं नाही. असंही विजय कुमार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ७० प्रवासी जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंद्र कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "घटनेचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १०-१० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.