अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे. तसतसे या कटाचे नवनवीन पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या चौकशी नंतर आठ जणांना अटक झाली आहे. तपासात आता दोन बँक कर्मचाऱ्यांचं आरोपींशी संगनमत असल्याचं आढळून आलंय. कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये फेरफार करणे केवळ काउंटरवरील कर्मचाऱ्यांमुळे शक्य नव्हते. बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच देणग्यांची चोरी आणि नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा संशय आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणा एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करत आहे. देणग्यांची मोजणी करताना बँकेने कंत्राटी कर्मचारी नेमले होते. रत्नेश चतुर्वेदी आणि गगनदीप हे दोन बँक कर्मचारी संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार होते. मोजणीपासून ते बँकेत पैसे जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. बँकेला 3 महिने आधीच चोरीचा सुगावा लागला होता. बँकेने संबंधीत दोन्ही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली होती. मात्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना हटवलं नाही. मंदिरातील चोरीच्या पैशांतून एका आरोपीनं दोन मजली घर बांधल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी देणगी मोजणीच्या वेळी कॅमेऱ्यासमोर आपल्या साथीदारांचे वर्तुळ तयार करून रोख रक्कम काढत असत. जर त्यांना जागेवरच पैसे काढता आले नाहीत, तर ते मोजणीच्या नोंदवहीमध्ये चार ते पाच लाख रुपयांनी रक्कम कमी दाखवत आणि नंतर बँकेत जमा करताना तीच रक्कम काढत असत. या संपूर्ण प्रक्रियेत बँक कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मंदीरातील कथित अपहारासाठी ट्रस्टचे खजिनदारांना जबाबदार धरलं आहे.
दरम्यान राम मंदिरातील चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र कोर्टाने तातडीने सुनावणीला नकार देत 12 जुलै नंतर सुनावणीचे संकेत दिले आहेत. कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामलल्ल्याच्या मंदिरात दरोडा टाकणाऱ्या बड्या धेंड्यांना अटक कधी होणार ? हाच खरा सवाल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.