बदलापूर पश्चिममध्ये ७ दिवसांच्या बाळाची ६ लाखांत विक्री करण्याचा कट उघड
ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाचं स्टिंग ऑपरेशन
५ आरोपींना अटक, १ आरोपी फरार
पोलीस तपास सुरू
महाराष्ट्रात सध्या लहान मुलांना आमिष दाखवून किडनॅप करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नवी मुंबईतून १०० पेक्षा अधिक अल्पवयीन मुली गायब होत असल्याची बातमी सतत माध्यमांवर दाखवली जात होती. ही प्रकरणं ताजी असतानाच आता बदलापूर मधून ६ लाखांसाठी तब्बल ७ दिवसांच्या बाळाला विकण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावत पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना मानवी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. पोलिसांनी ७ दिवसांच्या बाळाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहकाचा वापर करण्यात आला. तसेच मानवी तस्करी करणाऱ्या टोळीसोबत संपर्क साधून बुधवार, २४ डिसेंबर रोजी रात्री बदलापूर पश्चिम भागातील एका हॉटेलजवळ भेटण्याचा कट रचला.
पोलिसांच्या प्लॅननुसार, सुरुवातीला या टोळीला टोकन म्हणून यूपीआयद्वारे २०,००० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर उरलेली ५.८ लाख रुपये रोख स्वरूपात दिली जाणार होते. दरम्यान, पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने सतर्क केल्यानंतर, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होत बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
शंकर संभाजी मनोहर (वर्षे ३६), रेश्मा शहाबुद्दीन शेख (वर्षे ३५), नितीन संभाजी मनोहर (वर्षे ३३) आणि शेखर गणेश जाधव (वर्षे ३५) आणि मुंबई मानखुर्द येथील एजंट आसिफ चांद खान (वर्षे २७) अशी आरोपींची नावे आहेत. तसेच या टोळीतील सबीना नावाची सहावी साथीदार फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या टोळीने नवजात बाळाला ६ लाख रुपयांना विकण्याचा कट रचला होता. सध्या या बाळाला विशेष काळजी केंद्रात दाखल केले असून बाळाच्या खऱ्या आईची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आम्हाला संशय आहे की, हा नवजात बालकांचे अपहरण करून त्यांना मुलं बाळ नसलेल्या जोडप्यांना विकण्याच्या एका मोठ्या घोटाळ्याचा भाग आहे. त्याचबरोबर नवजात बाळांना किडनॅप करून विकण्याच्या घोटाळ्यात रुग्णालये किंवा नर्सिंग होमचे मोठे जाळे सामील आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.