Uddhav Thackeray, Narendra Modi
Uddhav Thackeray, Narendra Modi -Saam TV
मुंबई/पुणे

PM Modi in Mumbai: मेहनत शिवसेनेची, प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर सामनातून सडकून टीका

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याची पान भरुन जाहीरात झळकली होती. 'मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी' असं या जाहिरातीचं शीर्षक होतं. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने आणि मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम सुरु आहे.

काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार, अशा शब्दात सामनातून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. बीएमसीने आणि शिवसेनेने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं आणि दुसरीकडे त्याच महापालिकेच्या कामांची चौकशी 'कॅग' वगैरेकडून करून बदनामी करायची. असा दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे. अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख बेडूक असा करण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय?

महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी काही तासांच्या मुंबई भेटीवर येत आहेत व या काही तासांत ते मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतील असे सांगण्यात आले. सरकारतर्फे तशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. पंतप्रधानांचे ठीक आहे, पण मुंबईच्या भविष्याची व भाग्योदयाची चिंता भाजपास केव्हापासून वाटू लागली हा प्रश्नच आहे. (Latest Marathi News)

मुंबईचा भाग्योदय मराठी माणसाने त्याच्या श्रमातून घडवला व त्याच मुंबईच्या लुटीवर दिल्लीश्वरांचे इमले उभे राहिले. मुंबईचे भविष्य व भाग्योदय 105 हुतात्म्यांनी घडवले, तो ओरबाडण्याचा प्रयत्न केला नाही तरी मुंबईवर उपकार होतील. त्यामुळे पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे

मिंधे गटाचा केविलवाणा प्रयत्न

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने मुंबई नगरी त्यांच्या झेंडय़ाने सजवली आहे. त्यात कोठे तरी मिंधे गटाने त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे व मगरीच्या जबड्या जाताना बेडूक अखेरचे डराव डराव करीत आहे असेच चित्र दिसत आहे.

शिवसेनेच्या कार्यकाळात ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत व त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे.

एकीकडे कामाचं कौतुक दुसरीकडे चौकशी

कोरोना काळात मुंबई पालिकेने केलेले काम जगाने वाखाणले. स्वतः पंतप्रधानांनी त्या कामाचे कौतुक केले. एकीकडे महापालिकेने म्हणजे शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय भाजपने घ्यायचे, त्या कामाची उद्घाटने पंतप्रधानांच्या हस्ते घडवून राजकीय सोहळे साजरे करायचे व त्याच वेळी त्याच महापालिकेच्या कामांची चौकशी 'कॅग' वगैरेकडून करून बदनामी करायची. असा दुटप्पी प्रकार चालला आहे. पंतप्रधानांना मुंबईत महापालिकेच्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी आणले ते महापालिका निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी. काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजप वाजवणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT