मुंबई : 'महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत'. अशी बोचरी टीका सामनातून शिंदे सरकारवर करण्यात आली. (Eknath Shinde News)
'मंत्रिमंडळ भरतीसाठी महाराष्ट्रातील कोणत्या निष्ठावंतांचा बळी जातोय तेच पाहायचे. एकंदरीत देशात कायद्याचे व संविधानाचे राज्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी महापुराचे, प्रलयाचे थैमान सुरू आहे. माणसे, गुरेढोरे, घरेदारे वाहून गेली आहेत. डोंगर, दरडी कोसळत आहेत. पण फुटीर गटाचे मुख्यमंत्री दिल्लीत राजकीय शक्तिप्रदर्शनात गुंग आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले आहे'. अशी घणाघाती टीकाही सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करण्यात आली.
'महाराष्ट्रात दरडी कोसळल्याने वाहतूक, जनजीवन ठप्प झाले आहे, पण राज्यात सरकारचे अस्तित्व नाही. सरकार म्हणजे फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाही हे यांना सांगायचे कोणी? इंदूर-अमळनेर एसटीस भीषण अपघात घडून त्यात अनेक जीव प्राणास मुकले, पण राज्याला पंधरा दिवसांनंतरही परिवहन मंत्री नाही. त्यामुळे मृतांचे नातेवाईक व जखमींचे अश्रू हे बेसहाराच बनले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे पूरपरिस्थितीची पाहणी करताना दिसत आहेत, पण त्यांचेही चित्त दिल्लीलाच लागून राहिले आहे'. अशी परिस्थिती सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. (Sanjay Raut News)
'महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे'. असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला. (Shivsena Latest News)
दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारांसोबत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. खासदारांच्या मतदारसंघातील घरे व त्यांची कार्यालये पोलिसांनी वेढून ठेवली आहेत. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदारांना इतके भय कोणाचे वाटत आहे? अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.